For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हाफिज सईदनेच रचला पहलगाम हल्ल्याचा कट

06:08 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
हाफिज सईदनेच रचला पहलगाम हल्ल्याचा कट
Advertisement

‘एनआयए’कडून पुरवणी आरोपपत्र दाखल : पाकिस्तानात बसून भारताविरुद्ध पुकारले युद्ध

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएने सोमवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. लश्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदने बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता, असा दावा एनआयएने आरोपपत्रात केला आहे. तसेच एनआयएने हाफिजवर भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचा ठपकाही ठेवला आहे.  पुरवणी आरोपपत्र पूर्वी दाखल केलेल्या मूळ 1,597 पानांच्या आरोपपत्राचा विस्तार आहे. यामध्ये पाकिस्तानचा कट, हाफिज सईदची भूमिका आणि तपासादरम्यान गोळा केलेल्या वैज्ञानिक व तांत्रिक पुराव्यांचा सविस्तर तपशील समाविष्ट आहे. हे आरोपपत्र घटनास्थळाचा सखोल तपास, न्यायवैद्यक विश्लेषण आणि इतर पुराव्यांच्या आधारे तयार करण्यात आले आहे.

Advertisement

22 एप्रिल, 2025 रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारणा करून ठार मारण्यात आले. या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले. यानंतर, भारताने 6-7 मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ लक्ष्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा भारताचा दावा आहे.

जम्मू येथील विशेष एनआयए न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात एनआयएने हाफिज सईदला एक वैयक्तिक आरोपी म्हणून नाव दिले आहे. त्याला बंदी घातलेली दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबा आणि तिची सहयोगी संघटना, द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) यांचा प्रमुख आणि संस्थापक म्हणूनही संबोधले आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, तपासात असे पुरावे समोर आले असून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे नियोजन पाकिस्तानमधून करण्यात आले होते. हल्ल्याचे नियोजन करणे, दहशतवाद्यांना सूचना देणे आणि सीमेपलीकडून संपूर्ण ऑपरेशन पार पाडण्यात हाफिज सईदने महत्त्वाची भूमिका बजावली, असे एनआयएचे म्हणणे आहे. सबळ पुराव्यांच्या आधारावर हाफिज सईदवर भारतीय दंड संहिता, 2023 आणि बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा, 1967 च्या विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. गंभीर आरोपांमध्ये भारताविरुद्ध युद्ध पुकारणे आणि गुन्हेगारी कट रचणे यांचा समावेश आहे.

पहिले आरोपपत्र डिसेंबर 2025 मध्ये

पहलगाम हल्ल्यानंतर, एनआयएने 15 डिसेंबर 2025 रोजी आपले 1,597 पानांचे पहिले आरोपपत्र दाखल केले होते. त्यात पाकिस्तानी दहशतवादी सूत्रधार साजिद जट्टसह सहा दहशतवाद्यांना आरोपी म्हणून नाव देण्यात आले. पहिल्या आरोपपत्रात हाफिज सईदचे नाव उघड करण्यात आले नव्हते. पहलगाम हल्ल्यात सामील असलेले तीन दहशतवादी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत ठार झाले आहेत. त्यांचा सूत्रधार, सैफुल्ला जट्ट उर्फ लंगडा, अजूनही जिवंत असून त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस आहे.

Advertisement
Tags :

.