एचवन-बी व्हिसा शुल्क महागणार
अमेरिकेत कामासाठी जाणाऱ्यांना फटका बसणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असणारा एचवन-बी व्हिसा मोठ्या प्रमाणात महाग करण्याचा निर्णय अमेरिकेच्या ट्रंप प्रशासनाने घेतला आहे. या व्हिसासाठीचे शुल्क यापुढे 1 लाख डॉलर्सहून अधिक असेल, अशी माहिती देण्यात आली. ज्या कंपनीत हे कर्मचारी काम करतात, त्या कंपनीला हे शुल्क भरावे लागणार आहे. या व्हिसाच्या माध्यमातून सर्वाधिक भारतीय अमेरिकेत कामासाठी जातात. त्यांना या नव्या वाढीव शुल्काचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या वर्षी ट्रंप यांनी अशाच प्रकारचे शुल्क लागू करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, हे वाढीव शुल्क अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविले होते. त्यामुळे त्यावेळी तो निर्णय लागू होऊ शकला नव्हता. आता ट्रंप प्रशासनाने नव्याने हे शुल्क लागू करण्यासाठी आदेश काढला असून हा आदेश लागू करण्यासाठीची प्रक्रिया हाती घेतली आहे. प्रत्येक वर्षी लाखो विदेशी उच्च शिक्षित तंत्रज्ञ या व्हिसावर अमेरिकेत कामासाठी जातात. या व्हिसाचा कालावधी 3 वर्षांचा असतो. दर 3 वर्षांनी त्याचे नूतनीकरण करुन घ्यावे लागते. ज्यांनी हा आदेश लागू होण्यापूर्वी हा व्हिसा घेतलेला आहे, किंवा त्याचे नूतनीकरण करुन घेतले आहे, त्यांच्यावर वाढीव शुल्क लागू होणार नाही. तथापि, नव्या व्हीसा आवेदनदारांवर ते लागू केले जाईल. हे शुल्क नोकरी देणाऱ्या कंपन्यांना भरावे लागणार असल्याने अशा कंपन्या विदेशी तंत्रज्ञांना नोकरी देणार नाहीत. याचा लाभ अमेरिकेतील तंत्रज्ञाना होऊ शकेल आणि त्यांना नोकऱ्या मिळतील, अशी ट्रंप यांची अपेक्षा आहे.
भारतासह सर्वच देशांवर परिणाम
अमेरिकेत अनेक देशांमधून उच्चशिक्षित तंत्रज्ञ कामासाठी जातात. त्या सर्वांना या वाढीव व्हिसा शुल्काचा फटका बसणार आहे. तथापि, आतापर्यंत एचवन-बी व्हिसाचा मोठा लाभ भारतीय तंत्रज्ञांना होत आहे, असे दिसून येते. आता वाढीव शुल्कामुळे कदाचित अमेरिकेत कामासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांचे प्रमाण घटेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, अमेरिकेच्या प्रशासनाचे हे धोरण अमेरिकेचीच हानी करु शकते, असेही अनेक जाणकारांचे मत आहे.