कॅन्टोन्मेंटमध्ये उभारली जाणार महिलांसाठी जीम
बुडाच्यावतीने प्रयत्न
► त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये महिलांसाठी बुडाच्या निधीतून जीम उभारली जाणार आहे. आमदार असिफ सेठ यांनी या जीमसाठी प्रयत्न सुरू केले असून कॅन्टोन्मेंटला जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. तीन ते चार खुल्या जागा महत्त्वाच्या ठिकाणी असून त्यापैकी एक जागेचा विचार केला जाणार आहे.
शहरात शिवाजी उद्यानासह इतर भागात पुरुषांसाठी खुल्या जीम आहेत. परंतु महिलांना व्यायामासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचे दिसून आले आहे. विशेषत: कॅन्टोन्मेंट परिसरात महिलांसाठी जीम नसल्याने त्यांना खासगी जीमला जाऊन व्यायामासाठी अधिकचा खर्च करावा लागत आहे.
बुडाचे चेअरमन व आमदार असिफ सेठ यांनी सोमवारी झालेल्या कॅन्टोन्मेंटच्या बैठकीनंतर महिलांसाठीच्या जीमबाबत प्रस्ताव मांडला. बुडाच्या निधीतून ही जीम उभारली जाईल, असे त्यांनी सांगितले. यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डकडून जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सीईओ सुदाम मंचलवार म्हणाले, कॅन्टोन्मेंटमधील तीन ते चार जागा जीमसाठी पाहणीत आहेत. त्या जागांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यापैकी एक जागा निश्चित केली जाईल. कॅन्टोन्मेंटचे सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांचीही परवानगी घेण्यात आली.