ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांची प्रमुख उपस्थिती
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
सावंतवाडीत श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, सीए लक्ष्मण नाईक, श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष रमेश बोंद्रे, स्वागताध्यक्ष अभिमन्यू लोंढे, संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, अध्यक्ष जावेद शेख, संपादक सागर चव्हाण, व्ही.टी. देवण, संप्रवी कशाळीकर आदी उपस्थित होते. सामाजिक भान ठेवून विधायक कार्य करणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य, सहकार, कला संगीत, कृषी क्षेत्रातील, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळण्यासाठी व इतरानी त्यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी या प्रामाणिक हेतूने ज्ञानदीप विकास मंडळाच्यावतीने गेली १९ वर्षे उपक्रम राबविण्यात येतो. हे पुरस्कार दरवर्षी प्रमाणे सौ रेश्मा रा भाईडकर आणि व्ही टी देवण यांनी पुरस्कृत केले होते.या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्ञानदीप विकास मंडळातर्फे कवयित्री कु. स्नेहा विठ्ठल कदम, माणगाव, सौ. शुभेच्छा सावंत बांदा, मंदार चोरगे वैभववाडी, सचिन वंजारी कणकवली, राजाराम फर्जंद दोडामार्ग, शैलेश तांबे वेंगुर्ला, रोहन पाटील दाणोली, राजेश कदम देवगड, कांचन उपरकर सावंतवाडी, अविनाश म्हापणकर सावंतवाडी यांना गौरव पत्र, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दाणोली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने उपस्थित सर्व मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ज्ञानदीपचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी संस्थेच्या १९ वर्षातील कार्याचा आढावा घेतला. यावेळी ज्ञानदीपचे कार्याध्यक्ष निलेश पारकर, खजिनदार एस आर मांगले, उपाध्यक्ष एस जी साळगावकर, कवी विठ्ठल कदम, वैभव केंकरे, आर. व्ही. नारकर, एकनाथ धोंगडे, सुनील नेवगी, दीपक गांवकर, सुनील कदम, पांडुरंग कातकर आदींसह ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत गावडे तर सहसचिव विनायक गांवस यांनी आभार मानले.