‘मुंबई लोकल’मध्ये झळकणार ज्ञानदा
प्रथमेश परब असणार मुख्य भूमिकेत
अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच ‘मुंबई लोक’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 7 ऑगस्ट रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ज्ञानदाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत या चित्रपटाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. ‘7.18 ला हरवायचंय... आशिष सोबत उरायचं फक्त आठवणींचं स्टेशन! मुंबई लोक-प्रेमाचं टाइमटेबल’ असे तिने स्वत:च्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या चित्रपटातून एक हळुवार प्रेमकथा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि आनंदी एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अभिजीत यांनी केले आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शनचे निलेश राठी आणि आनंदी एंटरटेन्मेंटचे प्राची राऊत, सचिन अगरवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात प्रथमेश आणि ज्ञानदा ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे. मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे हे कलाकारही यात दिसून येतील.
मुंबई लोकल या चित्रपटात मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेमध्ये घडणारी एक मनोरंजक प्रेम कहाणी मांडण्यात आली आहे. ज्ञानदाच्या अनेक मालिका गाजल्या आहेत. याचबरोबर धुरळा या चित्रपटातही तिने काम केले आहे.