सीपीआर’मध्ये नुतनीकरणावर गुटख्याचा रंग
गुटखा, मावा खाऊन थुंकल्याने नवीन भिंतींचे विद्रूपीकरण
पिचकारी बहाद्दरांना वेळीच रोखण्याची गरज
नागरिक, कर्मचाऱ्यांची स्वयंशिस्तीची गरज
कोल्हापूर/ इम्रान गवंडी
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रूग्णालयात (सीपीआर) ४७ कोटी रूपयांच्या निधीतून नुतनीकरणाचे काम सुरू आहे. नवीन काम सुरू असतानाच अनेक ठिकाणी गुटखा, मावा, पान, तंबाखू खाऊन पिचकारी मारल्याने परिसराचे विद्रूपीकरण होत आहे. कोट्यावधी रूपयांच्या निधीतून होणाऱ्या नुतनीकरणाचा बेरंग होत आहे. अशा पिचकारी बहाद्दरांवर सीपीआर प्रशासनाने वेळीच रोखून दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.
सीपीआरमधील दुधगंगा इमारत महिला, पुरूष आंतररूग्ण विभाग व अतिदक्षता विभाग येथील जिन्याच्या निम्म्या भागावर पांढरी फरशी बसवण्यात आली आहे. नवीन बांधकाम सुरू असूनही काही रूग्णांचे नातेवाईक, कामानिमित्त येणारे नागरिक जिन्याच्या पायऱ्या शेजारील भिंतीवर गुटखा, पान, मावा खाऊन थूंकत आहेत. त्यामुळे परिसर अस्वच्छ होत आहे. उघड्यावर थुंकल्याने संसर्गाचा धोका असतो. त्यातच सीपीआरमध्ये रोज विविध आजारावर १००० ते १५०० रूग्ण येतात. अतिदक्षता विभागासह येथील अस्थिव्यंग विभाग, क्षयरोग विभाग, ट्रामा केअर सेंटर सर्वच विभाग रूग्णांनी फुल्ल असतात. अशा ठिकाणी उघड्यावर थुंकल्याने रूग्णांना संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. येथे येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईक व कर्मचाऱ्यांनीही स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे.
सीपीआरमध्ये नुतनीकरणातून नव्याने स्वच्छतागृह उभारणी, फरशा बसवणे, मोडलेली दारे, खिडक्या बसवणे, डागडुजीकरण, सर्व विभागातील जुन्या फरशा काढून नवीन फरशा बसवणे, अद्ययावत तंत्राने बसवणे, रंगरंगोटी, नवीन विभाग अद्ययावत करणे, नवनवीन सुविधा उपलब्ध करणे आदी कामे सुरू आहेत. यासाठी ४६ कोटी रूपयांच्या निधीही उपलब्ध झाला आहे. नुतनीकरणानतंर सीपीआरचे रूपडे पालटणार आहे. मात्र, गुटखा, पान, मावा खाणाऱ्या पिचकारी बहाद्दरामुळे नुतनीकरणास बाधा पोहचत आहे. अशा पिचकारी बहाद्दरांना वेळीच रोखण्याची गरज आहे. अन्यथा, कोट्यावधी खर्चूनही सीपीआर चकाचक होणार नाही.
कर्मचाऱ्यांच्या तपासणीची गरज
सीपीआर आवारात विविध विभागातील कर्मचारी, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी ड्युटीवर असतानाही गुटखा, मावा खात असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. तसे अनेकवेळा निदर्शनासही येते. अशा कर्मचाऱ्यांवर नजर ठेवून कारवाईची गरज आहे. काही कर्मचारीच असे वागत असतील तर नागरिकांना शिस्त कशी लागणार, असा प्रश्न आहे.
सीपीआर प्रशासनाची हतबलता...
सीपीआरमध्ये जिल्ह्यासह परराज्यातून रूग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी मोफत व माफक दरात उपचार दिले जातात. हजारो रूग्ण व नातेवाईकांची रोज वर्दळ असते. दंडात्मक कारवाई होत असली तरी नागरिक नजर चुकवून पिचकारी मारतातच. त्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे.
गुटख्याची खुलेआम विक्री.. तरीही पोलीस अनभिज्ञच
राज्य शासनाने सुगंधीत सुपारी, गुटखा विक्री, साठवणुकीवर बंदी घातली आहे. तरीही शहरासह उपनगरातील किराणा मालाची दुकाने, छोट्या-मोठ्या पान टपऱ्यांवर गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. मावा विक्रीसाठी तर शहरातील बहुतांश पान टपऱ्या प्रसिद्ध आहेत. असे असताना पोलीस प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधल्याचा आव आणत आहे.
नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज
सीपीआर आवारात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ हाताळण्यास बंदी आहे. तरीही नागरिक गुटखा खाऊन थुंकतातच. अशा लोकांवर सीपीआरचे सुरक्षारक्षकांकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. रूग्णसेवा मिळणाऱ्या ठिकाणाला बाधा पोहोचू नये, यासाठी नागरिकांनी स्वत:च विचार करून स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे.
डॉ. सत्यवान मोरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर