गुटखा तस्करांवर उमरगा पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 5.75 लाखांचा मुद्देमाल जप्त, बीडमधील दोघांना अटक,
उमरगा: सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलमोड चेकपोस्ट परिसरात नाकाबंदी दरम्यान उमरगा पोलिसांनी स्विफ्ट डिझायर कारमधून अंदाजे 2 लाख 75 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. मंगळवारी (ता. 15) मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी कारचालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.शेख रिहान (31) आणि सय्यद अफरोज (28), दोघेही रा. मोमीनपुरा, बीड, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी शेख रिहान हा कारचालक आहे.
तलमोड चेकपोस्ट परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू असताना पोलिसांनी संशयावरून स्विफ्ट डिझायर कार थांबवून तिची झडती घेतली. यावेळी कारमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी अंदाजे 2.75 लाख रुपयांचा गुटखा आणि सुमारे तीन लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार, असा एकूण 5 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुटखा वाहतुकीविरोधात पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. त्याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी पल्लवी इमडे यांनी फिर्याद दिली आहे. गुटख्याची वाहतूक नेमकी कुठून करण्यात आली होती आणि तो कुठे पोहोचविला जाणार होता, याचा तपास सुरू आहे.
विभागीय पोलीस निरीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक पिराजी तायवडे, पोलीस उपनिरीक्षक व्ही एम शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल जाधव, विनोद मोरे, भागवत घाटे, होमगार्ड पवन राठोड, संतोष पवार व इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.तलमोड चेकपोस्टवरील या कारवाईमुळे गुटखा वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.