गुंजी माऊलीदेवी यात्रोत्सवाची आज सांगता,महाप्रसादाचा घेतला भाविकांनी लाभ
तिसऱ्या दिवशीही भाविकांची अलोट गर्दी
वार्ताहर/गुंजी
गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या श्री माऊलीदेवी यात्रोत्सवाची आज बुधवारी सांगता होणार आहे. शनिवारी पालखी सोहळ्याने या यात्रोत्सवास सुरुवात झाली होती. माऊलीदेवीची प्रसिद्धी आणि जागृतता गुंजी पंचक्रोशीबरोबरच सर्वदूर पसरली असल्याने विविध ठिकाणाहून हजारो भाविकांनी या यात्रोत्सवात सामील होऊन देवीचे दर्शन घेतले. त्यामुळे रविवारपासून सलग तीन दिवस दर्शनासाठी अलोट गर्दी उसळल्याने देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत होत्या. या काळात गुंजीतील श्री माऊली जनसेवा फाऊंडेशनच्यावतीने रविवारी महाप्रसादाचे आयोजन करून दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांची उत्तम सोय करण्यात आली. त्यामुळे जवळजवळ दहा हजार भाविकांनी याचा लाभ घेतला. तर सोशल फाऊंडेशन आणि चव्हाटा ग्रुप यांच्यावतीने सलग तीन दिवस करमणुकीचे कार्यक्रम सादर करण्यात आले. बुधवारी सकाळपासून इंगळ्या नहाणे, तुलाभार, ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार असून दुपारी 2 वाजता देवी भंडारण्याचे गाऱ्हाणे होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.