गुंजी मराठी शाळा समस्यांच्या विळख्यात
विविध समस्यांनी शाळा ग्रासली : पालक वर्गातून नाराजी
वार्ताहर/गुंजी
गळके छत, सभोवताली आणि छतावर वाढलेले गवत, कचऱ्याचे ढिगारे, दुर्गंधीयुक्त शौचालय आणि मुतारी, बंद अवस्थेतील प्रोजेक्टर, संगणक आणि पाणी फिल्टर, अपुऱ्या शिक्षक संख्येअभावी सामूहिक वर्ग शिक्षण पद्धती, अशा विविध समस्यांनी गुंजीतील सरकारी मराठी शाळा ग्रासली जात असल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. बुधवारी गुंजी ग्राम पंचायत अध्यक्षा, उपाध्यक्ष, सदस्य आणि ग्रामस्थांनी अचानक शाळेला भेट देऊन शाळा परिसराची पाहणी केली असता सदर बाब निदर्शनास आली. यावेळी येथील विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्गात पावसाचे पाणी गळत असल्याचे सांगून पिण्याच्या पाण्याचीही समस्या मांडली. तसेच मुलांना शिकवण्यासाठी लावण्यात आलेले प्रोजेक्टर, संगणक बंद स्वरूपातच असल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्याचबरोबर वापराविना अडगळीत पडलेले पाण्याचे फिल्टर, सभोवताली वाढलेले गवत आणि विखुरलेला कचरा पाहून ग्रामस्थांनी शाळेच्या दुरवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली.
मुख्याध्यापक पदही रिक्तच
त्याचबरोबर अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे एका वर्गात दोन-दोन वर्ग बसवून शिकविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. गेल्या दोन-तीन वर्षापासून या शाळेत मुख्याध्यापक पदही रिक्तच असून शाळेचा कारभार प्रभारी मुख्याध्यापकाद्वारे रेटण्यात येत आहे. या सर्व कारणांनी शाळेची पटसंख्याही खालावली जात असल्याची चर्चा पालक वर्गातून होत असून, संबंधितांनी शाळेच्या विकासावर भर देऊन उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.