गुंजेनहट्टी होळी कामाण्णा यात्रोत्सवाला प्रारंभ
आज यात्रेचा मुख्य दिवस
वार्ताहर/कडोली
धूलिवंदनादिवशी खग्रास चंद्रग्रहणामुळे गुंजेनहट्टी येथील श्री होळी कामाण्णा यात्रोत्सवावर परिणाम जाणवल्याने भाविकांची संख्या रोडावली होती. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सालाबादप्रमाणे गुंजेनहट्टी येथील जागृत देवस्थान श्री होळी कामाण्णा देवालयाची यात्रा धूलिवंदनानिमित्त मंगळवारी सुरू झाली. देवस्थान पंच कमिटीने परंपरेनुसार सकाळपासून धार्मिक कार्यक्रम पार पाडले आणि यात्रोत्सवाला सुरुवात झाली. पण यात्रेवर चंद्रग्रहणाचा परिणाम जाणवल्याचे दिसून आले. ग्रहणकाळात विधी पाळणे आवश्यक असल्याने धार्मिक विधी करणे अवघड होते. हे सर्व जाणून घेऊन भाविकांनी मंगळवारी यात्रेकडे न येणेच पसंद केले.
त्यामुळे यात्रेला भाविकांची संख्या नगन्य होती. रात्री उशिरा भाविकांची हजेरी थोड्या प्रमाणात सुरू होती. परंतु बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असून बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतून भाविक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. यात्राकाळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये, भाविकांना त्रास होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या यात्रेसंदर्भात माहिती घेण्यासाठी पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, ग्रामीणचे एसीपी गंगाधर, पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी गुंजेनहट्टी गावाला भेट दिली आणि देवस्थान पंच कमिटीकडून सर्व आढावा घेतला. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस खात्याकडून सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.