यशाच्या ‘ट्रॅक’वर गुलवीर सिंगची दौड !
आशियाई खेळांत विशेष चमक दाखविलेल्या खेळाडूंमध्ये उठून दिसतंय ते धावपटू गुलवीर सिंगचं नाव...त्यानं दोन रौप्य नि एक कांस्य अशी तीन पदकांची कमाई करत ‘हॅट्ट्रिक’ नोंदविली अन् दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळविलं..गुलवीरच्या नेत्रदीपक कामगिरीवर टाकलेली नजर...
‘त्याला’ एका दशकापूर्वी, ‘अॅथलीट’ बनण्यापूर्वी माहित होतं ते फक्त धावणं...शेतात वडिलांना मदत करण्यासाठी, कुटुंबाची कामं करण्यासाठी आणि भारतीय सैन्यात निवड होण्यासाठी धावणं....मात्र काही वर्षांनंतर तीच आपली ओळख बनेल असं अलिगडजवळील अत्रौली तालुक्यातील सिरसा गावातील त्या मुलानं स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं...
29 सप्टेंबर...भारताच्या त्या लांब पल्ल्याच्या धावपटूनं पुऊषांच्या 5 हजार मीटर्स शर्यतीत कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक ‘हॅट्ट्रिक’ पूर्ण केली...त्याआधी ‘त्यानं’ रौप्यपदकं कमावली होती ती 1500 मीटर्स आणि 10 हजार मीटर्स शर्यतीत...या कामगिरीसह, आशियाई खेळांच्या एकाच आवृत्तीत अॅथलेटिक्समध्ये तीन वैयक्तिक पदकं जिंकणारा ‘तो’ केवळ दुसरा भारतीय पुऊष आणि एकंदरित चौथा भारतीय खेळाडू...गुलवीर सिंग...
गुलवीरच्या खात्यात ही पदकं जमा झाली ती अत्यंत थकवणाऱ्या वेळापत्रकानंतर. त्यानं पाच दिवसांत 1500 मीटर्स शर्यतीच्या पात्रता फेरीसह चार शर्यतींमध्ये भाग घेतला आणि तिन्ही मुख्य स्पर्धांमध्ये पदक जिंकण्यात यश मिळविलं...‘पाच दिवसांत चार शर्यती धावल्यामुळं खूप थकवा आला होता, पण आता मी तीन पदकं घेऊन परततोय. मला खूप आनंद झालाय. कारण मला नेहमीच भारतासाठी काही तरी योगदान द्यायचं होतं आणि ते मी साध्य केलंय’, त्याचे शब्द...
गुलवीर सिंगच्या शरीर सावरण्याच्या प्रक्रियेत सातत्यपूर्ण ‘एंड्युरन्स ट्रेनिंग’ आणि ‘भारतीय अ्रथलेटिक्स महासंघा’नं उपलब्ध करून दिलेल्या खास फिजिओथेरपिस्टची मदत यांचा मोलाचा वाटा राहिला...या कामगिरीमुळं तो दिग्गज भारतीय खेळाडूंच्या एका प्रतिष्ठित गटात सामील झालाय. यापूर्वी नवी दिल्लीत झालेल्या 1951 च्या शुभारंभी आशियाई खेळांत अॅथलेटिक्समध्ये तीन पदकं आपल्या नावावर जमा केली होती ती लेव्ही पिंटो यांनी....1986 मध्ये सोल इथं पी. टी. उषानं चार पदकं जिंकली, तर 2002 साली बुसानमध्ये के. एम. बीनामोलनं तीन पदकांची कमाई केली...
यापूर्वी हांगझोऊ येथील 2022 चे एशियाड हा गुलवीरसाठी एक वेगळाच अनुभव होता. त्यावेळी त्यानं स्वत:चं वर्णन ’कच्ची गुणवत्ता’ अशा शब्दांत केलं होतं आणि स्पर्धेच्या भव्यतेमुळं दडपण आल्याचंही कबूल केलं होतं. चार वर्षांनंतर त्या भीतीची जागा आता आत्मविश्वासानं घेतलीय...‘तेव्हा ती गोष्ट नवीन होती. त्यामुळे मला भीती वाटायची. पण आता मी ऑलिम्पिक नि आशियाई स्पर्धांतील पदक विजेत्यांसोबत रोज सराव करतो. त्यामुळं मला वाटतं की, जर मी या खेळाडूंसोबत सराव करत असेल, तर मग त्यांच्याशी स्पर्धा का करू शकणार नाही ?’, तो सांगतो...
ग्लासगो आठवतंय ?..तिथं पाऊस पडत असताना या आशियाई विजेत्यानं राष्ट्रकुल खेळांतील पुऊषांच्या 10 हजार मीटर्स शर्यतीत रौप्यपदक जिंकून आपल्या यादीत आणखी एका मोठ्या पदकाची भर घातली होती. 27 मिनिटं 49.78 सेकंदांची वेळ नोंदवत गुलवीर या प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. ही कामगिरी त्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली...त्यासरशी तो मिल्खा सिंग, अविनाश साबळे, हरमिंदर सिंग (2010-पुऊषांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्य) आणि कविता राऊत (2010 : महिलांच्या 10 हजार मीट्रर्स शर्यतीत कांस्यपदक) यांच्या पंक्तीत सामील झाला. या सर्वांनी राष्ट्रकुल खेळांत रिलेव्यतिरिक्त म्हणजे वैयक्तिक प्रकारांत पदकं जिंकली होती...यापैकी साबळेनं 2022 मध्ये बर्मिंगहॅम इथं स्टीपलचेसमध्ये रौप्य जिंकलं, तर 1958 च्या कार्डिफ गेम्समध्ये मिल्खा यांनी पटकावलं ते 440 यार्ड्समधील सुवर्णपदक. ते राष्ट्रकुल खेळांतील देशाचं पहिलं पदक...
विशेष म्हणजे कविता राऊत वगळता हे सर्व खेळाडू भारतीय सैन्यातील...जरी गुलवीर सिंगनं धावपळीच्या आयुष्यापासून दूर पळण्यासाठी सैन्यात प्रवेश केला होता, तरी त्याच्यासाठी धावणं कधीच थांबलं नाही. ‘सैन्यात भरती झाल्यानंतर मला खेळांबद्दल सांगण्यात आलं आणि पदकं जिंकल्यास मला बढती मिळेल असंही स्पष्ट करण्यात आलं. मग मी धावण्यास सुऊवात केली आणि माझी बदली पुण्यातील ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मध्ये झाली. तिथं मी स्पर्धांसाठी सराव करू लागलो, सैन्यात नायब सुभेदार असलेला गुलवीर सांगतो...त्याच्या स्नायूंची ताकद व उपजत कौशल्य यांच्या जोरावर त्यानं परिस्थितीशी वेगानं जुळवून घेतलं आणि लवकरच तो लष्करातील ‘इंटर-युनिट’ शर्यती जिंकू लागला...
2021 येईपर्यंत गुलवीर सिंग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सराव करू लागला...त्यानं आपलं पहिलं वरिष्ठ गटातील पदक (कांस्य) जिंकलं ते 2022 च्या ‘फेडरेशन चषक’ स्पर्धेत...त्यानंतर त्यानं 5 हजार मीटर्स शर्यतीतही भाग घेण्यास सुऊवात केली आणि राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करण्याबरोबरच 2023 च्या हांगझोऊ आशियाई खेळांतही कांस्यपदक मिळवलं...
‘मला माहित आहे की, धावणं हे माझं काम आणि मला ते चांगल्या प्रकारे करायचंय...शर्यतीदरम्यान पदक कसं जिंकायचं एवढाच विचार माझ्या मनात होता. संपूर्ण शर्यतीत मी इतर कशाचाही विचार केला नाही’, राष्ट्रकुलमधील यशानंतर गुलवीर सिंह म्हणाला होता...त्यानंतर लगेच आशियाई खेळांत मिळालेली ही तीन पदकं त्याला आशियाई स्तराच्या पलीकडे जाऊन विचार करण्यास निश्चितच भाग पाडतील. विविध अंतरांच्या शर्यतींमध्ये आपण दमदार आव्हान उभं करू शकतो हे त्यानं सिद्ध केलेलं असलं, तरी पुढील टप्प्यासाठी अधिक निवडक नियोजनाची गरज असल्याची सुद्धा त्याला जाणीव आहे...
‘जपानमध्ये भारतासाठी पदकं जिंकण्यास मुख्य प्राधान्य होतं, पण आता पुढं जाताना मला जागतिक स्पर्धा नि ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवायचीय...कोणतं अंतर माझ्यासाठी योग्य ठरेल आणि कोणतं नाही हे ठरवणं महत्त्वाचं. त्यामुळे मी याबाबतीत अतिशय विचारपूर्वक पावलं उचलणार’, गुलवीर सिंग म्हणतो...सध्या तरी त्याला यशस्वी फॉर्म्युला गवसलाय आणि तो म्हणजे शिस्तबद्ध सराव, शाकाहारी आहार, हनुमानावरील श्रद्धा व आपण सर्वोत्तम खेळाडूंच्या पंक्तीत बसण्यास पात्र आहोत हा आत्मविश्वास !
गुलवीरचा प्रवास...
- गुलवीर सिंगचा जन्म 1 जून 1998 रोजी झाला तो उत्तर प्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात...लष्करी सेवेची परंपरा असलेल्या गावात वाढलेल्या गुलवीरनं कधीच अॅथलेटिक्समधील कारकिर्दीचा विचार केला नव्हता...
- त्यांच्या धावण्याच्या क्षमतेची ओळख सर्वप्रथम झाली ती 2018 मध्ये अऊणाचल प्रदेशातील पहिल्या लष्करी नियुक्तीदरम्यान 12 किलोमीटर्सच्या शर्यतीत भाग घेतल्यानंतर...
- गुलवीरच्या कारकिर्दीला खरी कलाटणी 2022 मध्ये कालिकत इथं झालेल्या ‘फेडरेशन चषक’ स्पर्धेत मिळाली. तिथं त्यानं 10 हजार मीटर्स शर्यतीत कांस्यपदक पटकावलं...
- 2024 मध्ये त्यानं अमेरिकन प्रशिक्षक स्कॉट सिमॉन्स यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेतील कोलोरॅडो स्प्रिंग्स येथील उंच ठिकाणावरील प्रशिक्षण केंद्रात आपला सराव सुरू केला. हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरून पुढील दोन हंगामांत गुलवीर आशियातील प्रमुख लांब अंतराच्या धावपटूंपैकी एक म्हणून उदयास आला. त्यानं 3 हजार मीटर्स, 5 हजार मीटर्स व 10 हजार मीटर्स शर्यतींमधील भारतीय विक्रम वारंवार मोडीत काढले...
- गुलवीर सिंगसाठी 2025 चा हंगाम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. दक्षिण कोरियातील गुमी इथं झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत त्यानं 5 हजार मीटर्स व 10 हजार मीटर्स अशा दोन्ही शर्यतींत सुवर्णपदकं जिंकली...
- यंदा मार्चमध्ये, एका तासापेक्षा कमी वेळेत ‘हाफ-मॅरेथॉन’ पूर्ण करणारा गुलवीर हा पहिले भारतीय ठरला...त्यानं न्यूयॉर्क सिटी ‘हाफ-मॅरेथॉन’मध्ये 59:42 मिनिटांची वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला आणि 2020 मध्ये अविनाश साबळेनं प्रस्थापित केलेला 1:00:30 चा जुना भारतीय विक्रम मोडला...
- याशिवाय गुलवीर अमेरिकेतील ‘म्युझिक सिटी ट्रॅक कार्निव्हल’मध्ये एक मैलाची शर्यत चार मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारा पहिला भारतीय...
शाकाहार नि हनुमानावरील श्रद्धा...
आशियाई खेळांतील कठीण अशा मोहिमेदरम्यान गुलवीर सिंगला आवश्यक ऊर्जा पुरविली ती डाळ, चपाती आणि पनीर यांसारख्या पूर्णपणे शाकाहारी आहारानं, तर मानसिक बळ दिलं ते त्याच्या खोलीतील बजरंग बलीच्या छोट्या मूर्तीनं...स्पर्धेदरम्यानच्या आहाराबद्दल गुलवीर म्हणाला, ‘मी मांसाहार करत नाही. मी अंडीही खात नाही. मी पूर्णपणे शाकाहारी आहे. मी चपाती, डाळ आणि पनीर खातो. माझा आहार व ‘सप्लिमेंट्स’ चांगले आहेत. मी पुरेशी प्रथिनं घेतो’...एशियाडच्या तयारीपोटी अमेरिकेत सराव करत असतानाही आपण कसोशीनं शाकाहारीच राहिल्याचं त्यानं नजरेस आणून दिलं...
- राजू प्रभू