Satara News | आखाती युद्धाची झळ लाल मातीच्या आखाड्यापर्यंत..... गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक, सराव करताना पैलवानांची दमछाक
गॅस टंचाईचा कुस्ती आखाड्यांवर परिणाम
औंध ( फिरोज मुलाणी) - मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाची झळ आता थेट कुस्तीच्या आखाड्यांपर्यंत पोहोचली आहे.गॅस टंचाईचा फटका केवळ सामान्य माणसापर्यंत मर्यादित राहिला नाही. गॅस मिळत नसल्याने पैलवानांंना चुली पेटवण्याची वेळ आली आहे आहे.परिणामी, चुलीवर स्वयंपाक आणि सराव यांचा ताळमेळ बसवताना पैलवानांची अक्षरशः दमछाक होत आहे.
गस टंचाईवर मात करण्यासाठी काही आखाड्याच्या परिसरात स्वयंपाकासाठी पैलवानांनी पारंपरिक चुली पेटवल्या आहेत. चुलीवर स्वयंपाक करणे वेळखाऊ आणि कष्टाचे असल्याने त्याचा थेट परिणाम सरावाच्या वेळापत्रकावर होत आहे.सराव आटोपल्यानंतर काही पैलवान चुली पेटवतात. एका चुलीवर भाजी तर दुसरीकडे चपात्या भाजल्या जातात. धुराने भरलेल्या वातावरणात डोळे चुरचुरत असले तरी पैलवान जेवण तयार करतात.
सकाळी दोन-तीन तास जोरदार सराव होतो. आधी गॅसवर पटकन जेवण तयार व्हायचं. आता चुलीवर स्वयंपाक करायला वेळ आणि कष्ट दोन्ही लागतात. चुलीवर स्वयंपाक करताना वेळ जास्त लागतो, त्यामुळे सरावाचे वेळापत्रकही बिघडत असल्याचे मल्ल शुभम शिंदे,सुमित जाधव,शंभू हगवणे यांनी सांगितले.