ऊर्जा कोंडी सोडविणारा आखाती दौरा
अमेरिका समस्यांचा चक्रव्यूह निर्माण करते आणि भारत तो चक्रव्यूह भेदून आर्थिक महासत्तेकडे समर्थपणे वाटचाल करू लागतो. याचा प्रत्यय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यातून जसा आला तसा जयशंकर यांच्या आखाती देशांच्या दौऱ्यातून सुद्धा प्रकट झाला आहे. आखातामध्ये युद्धाचे ढग असताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सहा आखाती देशांचा दौरा केला. त्यापैकी त्यांनी भेट दिलेल्या चार देशांचा दौरा हा अत्यंत महत्त्वाचा असून भारतातील ऊर्जा कोंडी सोडविणारा सकारात्मक दौरा असेच त्याचे वर्णन करावे लागेल.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आखाती युद्धातील ताण-तणाव आणि ऊर्जा कोंडी सोडविण्यासाठी करावयाच्या प्रयत्नासंदर्भात कतार तसेच बहरीन, कुवेत आणि ओमान या चार देशांचा दौरा केला. या दौऱ्यामुळे पश्चिम आशियातील युद्ध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी ऊर्जा सुरक्षा तसेच अमेरिका-इराण यांच्यातील तह, आखातातील स्थैर्य आणि परदेशस्थ भारतीयांचे कल्याण यावर त्यांनी मुख्य लक्ष केंद्रित केले होते. या देशांशी असलेले भारताचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि ऊर्जा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्याबरोबर आर्थिक व सामाजिक भागीदारी दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले टाकण्यात आली आहेत.
त्यांच्या या दौऱ्याची मुख्य फलश्रुती काय असेल तर भारतासमोरील ऊर्जा संकट सोडविण्यासाठी त्यांनी या देशांकडून मिळविलेली आश्वासने आणि निश्चित सहाय्य योजनांना अंतिम रूप देण्यात त्यांना आलेले यश असे म्हणता येईल. या चार देशांच्या भेटीदरम्यान काही प्रमुख निष्कर्ष आणि फलश्रुतींचा तपशील हाती आला आहे तो येथे थोडक्यात पुढीलप्रमाणे मांडला आहे.
ऊर्जा संकटावर उपाय आणि व्यापार वृद्धी
आखातामधील प्रमुख देशांच्या नेतृत्वासोबत भारत दीर्घकालीन सुसंवाद साधत आहे. हा सुसंवाद ऊर्जापुरवठा सुरक्षित करणे या मुद्यावर जसा भर देणारा आहे तसाच तो आर्थिक गुंतवणूक अधिक वाढविणे आणि विकास योजनांना पूरक गती देणे यावर प्रामुख्याने द्विपक्षीय चर्चा केंद्रित झालेली होती. आखाती युद्धाचा सर्वात मोठा परिणाम भारताच्या वेगवान आणि गतिमान अर्थव्यवस्थेवर होत आहे. तो कमी करण्यासाठी आणि आपल्या नागरिकांचे हितसंवर्धन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी टाकलेल्या दमदार पावलामुळे भारतीय नागरिकांना ऊर्जा संकट जाणवले नाही. तथापि आखातामधील तणाव अजून निवळत नाही तोपर्यंत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आखातामधून भारताला होणारा पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत. युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कटली होती. आता या पुरवठा साखळीचे चक्र पुन्हा गतिमान करण्यासाठी आणि पुरवठा साखळीत भक्कम संरक्षण देण्यासाठी जयशंकर यांनी प्रयत्न केले आहेत. या दृष्टीने ऊर्जा संकट सौम्य करण्यात तसेच आर्थिक आणि व्यापारी संबंध दृढ करण्यात त्यांना निश्चितपणे यश आले आहे. त्यामुळे ऊर्जा संकट सोडविण्यात भारताला आलेले यश केवळ गृहीत धरून चालणार नाही तर पुढील काळात हे संकट अधिक सौम्य करण्यासाठी आणखी काळजीपूर्वक पावले टाकली पाहिजेत, या दृष्टीने जयशंकर यांनी टाकलेला हा बुद्धिबळाचा डाव अत्यंत महत्त्वाचा आहे.
प्रादेशिक सुरक्षा आणि सत्ता समतोल
आखातामध्ये अमेरिका व इस्रायल यांनी इराणविरोधात लष्करी कारवाई केल्यानंतर पश्चिम आशियातील सत्ता समतोल बिघडत चालला आहे. आखातामध्ये युद्ध थांबले पाहिजे आणि शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, हा भारताचा आग्रह असल्यामुळे जयशंकर यांनी कतारला भेट देऊन शांतता बोलणी कुठल्या टप्प्यावर आहे ते समजावून घेतले तसेच कतारच्या नेत्यांशी याबाबतीत महत्त्वपूर्ण चर्चा केली आहे. नाजूक आणि दोलायमान शस्त्र संधी आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी केलेला चार देशांचा दौरा संवाद आणि कूटनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. त्यांनी एक तर भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी दमदार पावले टाकली आहेत तसेच आखातातील देशाशी असलेले आपले आर्थिक व व्यापारी संबंध पाहता भविष्यात घ्यावयाची काळजी कशी व कोणत्या दिशेने असली पाहिजे यावरही त्यांनी अचूक निदान केले आहे. आपल्या आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी विविध देशांच्या प्रमुखांशी सुसंवाद साधला आणि त्या त्या देशातील नेतृत्वाशी महत्त्वपूर्ण सुरक्षा मुद्यावर मौलिक चर्चा केली तसेच विचार आणि दृष्टिकोनांची देवाणघेवाण सुद्धा करण्यात आली आहे.
कतार सध्या पाकिस्तानप्रमाणेच शस्त्र संधीच्या बाबतीत अमेरिका व इराणमधला एक महत्त्वाचा मध्यस्थ आहे. कतार आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेऊन जयशंकर यांनी कतारच्या नेत्यांशी चर्चा करून याबाबतीत त्यांना कोणत्या दिशेने ठाम पावले टाकली पाहिजेत याबाबत मार्गदर्शन केले आहे. एकतर हे चारही देश तेल निर्मिती व पुरवठा याबाबतीत आघाडीवर आहेत. युद्ध थांबल्यानंतर या देशांकडून भारताला होणारा तेल पुरवठा आणि एलपीजी पुरवठा कसा सुरळीत होऊ शकेल याबाबत त्यांनी चर्चा केली. आंतरराष्ट्रीय राज्यकारणात निर्माण झालेले जटील प्रश्न ताबडतोब सुटू शकत नाहीत परंतु प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक वातावरण निर्मिती करणे तेवढेच महत्त्वाचे असते हे लक्षात घेऊन संवाद व कुटनीती या धोरणाचा अवलंब करून जयशंकर यांनी चार राष्ट्र प्रमुखांशी केलेली चर्चा ही भारताच्या दृष्टीने सुरळीत तेल पुरवठा व इंधनपुरवठा करण्याच्या दृष्टीने फलदायी ठरण्याच्या मार्गावर आहे.
परदेशस्थ भारतीयांचे कल्याण
आखातातील या चार प्रमुख देशांमध्ये एक कोटी 20 लाख पेक्षा अधिक भारतीय लोक राहतात. युद्धामुळे या भारतीयांच्या रोजगार व नोकरीवर जसा परिणाम झाला आहे तसे त्यांचे जीवनही युद्धामुळे अस्थिर बनले आहे. ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. त्यावर इराण सतत लक्ष करत आहे. त्यातून जीवित वित्तहानी होऊ शकते हे लक्षात घेऊन इराणला कसे नियंत्रित करता येईल आणि नुकसान कसे टाळता येईल यावर भारताचा प्रयत्न आहे. अलीकडील प्रादेशिक संघर्ष दरम्यान भारतीय खलाशी व नागरिकांना तत्परतेने मदत केल्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांनी यजमान राष्ट्रांचे म्हणजे ओमान इत्यादी देशांचे आभार मानले. याचा अर्थ असा होतो की आखाती देशांना विश्वासात घेऊन येथील भारतीयांच्या कल्याणासाठी त्यांना कार्यप्रवृत्त करणे व त्यांनी पूर्वी केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानणे अशा दोन्ही हेतूने त्यांनी या चार देशांचा दौरा केला होता. या देशाने अनिवासी भारतीयांना तन-मन धन अर्पण करून मदत केली. मोदी युगामध्ये अनिवासी भारतीयांची सर्वतोपरी काळजी घेण्याचे धोरण आखण्यात आले आहे.
द्विपक्षीय सहकार्याचे मौलिक सूत्र
जयशंकर यांनी चार आखाती देशांमध्ये केलेली भाषणे आणि मांडलेली सूत्रे यामध्ये एकसमान सुवर्ण धागा आहे. तो सुवर्ण धागा म्हणजे पश्चिम आशियातील समस्या सोडवण्यासाठी युद्ध हा मार्ग नव्हे खरा मार्ग आहे तो संवाद. याच मार्गाने पुढे वाटचाल केल्यास आखातांमधील पेचप्रसंग सोडविता येईल. युद्ध ऐवजी समेट, संघर्ष ऐवजी चर्चा आणि परस्पर हल्ले करण्याऐवजी परस्पर बोलणी करून प्रश्न सोडविले पाहिजेत ही भारताची भूमिका आहे.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर