For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गुळे येथे हातात शस्त्रे घेऊन दहशत माजविण्याचा प्रकार; युवकाकडून कुटुंबीयांसह पोलिसांवरही हल्ला

11:11 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुळे येथे हातात शस्त्रे घेऊन दहशत माजविण्याचा प्रकार  युवकाकडून कुटुंबीयांसह पोलिसांवरही हल्ला
Advertisement

काणकोण : मडगाव-कारवार महामार्गावरील गुळे येथे एका लोहार कुटुंबातील समीर चव्हाण (२२ वर्षे) या युवकाने दोन्ही हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवितानाच आपल्या कुटुंबावर तसेच पोलिसांवर देखील हल्ला केला. त्यानंतर जंगलात पळून गेलेल्या सदर युवकाला काणकोण पोलिसांनी अत्यंत शिताफीने पकडले. त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

Advertisement

या प्रकारामुळे गुळे येथे तणावपूर्ण असे वातावरण निर्माण झाले आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून सदर कुटुंबामध्ये वाद चालू असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेले त्याचे वास्तव्य हटविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सदर लोहार कुटुंब गुळे येथे मागच्या कित्येक वर्षांपासून वास्तव्य करत आलेले असून शेतकऱ्यांना लागणारी कोयता, कुहाड आणि अन्य अवजारे तयार करून देण्याचे काम करत आले आहे. याच व्यवसायावर सदर कुटुंब आपला उदरनिर्वाह करत आलेले आहे.

या कुटुंबातील अन्य ठिकाणी वास्तव्यास असलेला समीर चव्हाण हा युवक दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी आला. त्यानंतर वादाला प्रारंभ झाला, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. गुळे येथे आल्यानंतर दोन्ही हातात कोयते घेऊन त्याने आपल्याच कुटुंबीयांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि हस्तक्षेप करायला गेलेल्या स्थानिक नागरिकांवरही कोयते उगारल्यामुळे वाड्यावर भीतीचे त्याचबरोबर संतापाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची खबर मिळताच घटनास्थळी धावून गेलेल्या पोलिसांच्या अंगावरही सदर युवक कोयते घेऊन धावून गेला, अशी माहिती काणकोणचे निरीक्षक तेहरान डिकॉस्ता यांनी दिली.

Advertisement

ग्रामस्थांकडून झोपडीची मोडतोड
या घटनेनंतर जंगलात पळून गेलेल्या सदर माथेफिरू युवकाला पकडण्यात काणकोण पोलिसांना यश आले. सदर युवक मानसिकदृष्ट्या ठीक नसण्याची शक्यता डिकॉस्ता यांनी व्यक्त केली असून पुढील कारवाई चालू केली आहे. दरम्यान, संतापलेल्या ग्रामस्थांनी मागच्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्य करून असलेल्या सदर कुटुंबाच्या झोपडीची मोडतोड केली.

मंत्री तवडकर, श्रीस्थळ पंचायतीच्या पंचांची घटनास्थळी धाव
गुळे येथे ही घटना घडल्यानंतर श्रीस्थळ पंचायतीचे पंच गणेश गावकर आणि अक्षदा वेळीप घटनास्थळी धावून आल्या. सदर कुटुंबात वारंवार भांडणे होऊन गावात शांतताभंग होण्याचे प्रकार घडत असल्यामुळे समीर चव्हाण आणि सदर कुटुंबाची गावातून हकालपट्टी करावी, अशी मागणी या दोन्ही पंचानी श्रीस्थळ पंचायतीमध्ये केली होती, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेची खबर मिळताच काणकोणचे आमदार तथा क्रीडामंत्री डॉ. रमेश तवडकर यांनीही रात्री घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचे अवलोकन केले. संबंधित कुटुंबावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिस निरीक्षकांना दिले आहेत.

Advertisement
Tags :

.