गुलालोत्सव उत्साहात साजरा
पणजीसह शहरे, गावागावांत पारंपरिक पद्धतीने रंगोत्सवाचा जल्लोष
पणजी : राजधानी पणजीसह गोव्यातील प्रमुख शहरे, गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने गुलालोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यात लहान मुलांसह तरुण पिढीने आणि महिलांनी उत्साहात भाग घेतला. सर्वजण रंगोत्सवात न्हावून गेले. लोकवस्ती असलेल्या बहुतेक सर्व ठिकाणी हा रंगोत्सव साजरा झाला, तर गावांमध्ये तो धुळवडीच्या स्वरुपात आनंदाने साजरा करण्यात आला. पणजी शिमगोत्सव समितीतर्फे पणजी येथील आझाद मैदानावर सकाळच्या सत्रात दुपारपर्यंत मोठ्या धुमधडाक्यात गाणी लावून मौज-मजा करुन गुलालोत्सव खेळण्यात आला. सर्वांनी एकमेकांना रंग लावून उत्साहाचा आनंद लुटला.
पणजी शहरातील अनेक मान्यवर मंडळी तसेच प्रतिष्ठित नागरिक, महिला, शाळकरी मुले, तरुण-तरुणी, पर्यटक अशा विविध लोकांनी रंगोत्सवात भाग घेऊन गाण्यांच्या तालावर ठेका धरला आणि नृत्यही केले. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हे त्या रंगोत्सवात उत्साहाने सामील झाले. मराठी, कोकणी, हिंदी गाण्यांच्या तालावर अनेकांनी नाचण्याची हौस भागवून घेतली. तत्पूर्वी पणजी शिमगोत्सव समितीतर्फे श्री महालक्ष्मी देवीला नमन करुन ढोलताशांच्या गजरात रोमटामेळाची आझाद मैदानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली व नंतर सुमारे तीन तास आझाद मैदानावर गुलालोत्सवाचा कार्यक्रम रंगला.
पाटो-पणजी येथील सरकारी वसाहतीत बाल-गोपालांसमवेत रहिवाशांनी धुमधडाक्यात गुलालोत्सव साजरा केला. पूर्वसंध्येला वार्षिक परंपरेनुसार होळी दहनाचा कार्यक्रम झाला. गुलालोत्सवाच्या निमित्ताने पाटो वसाहतीत मुले, महिला वर्गासाठी तसेच सर्वांकरीता विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी त्या विभागाचे नगरसेवक विठ्ठल चोपडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. लहान मुलांनी पिचकारीने एकमेकांवर रंग उडवण्याचा आनंद लुटला. म्हापसा, मडगाव, फोंडा, वास्को व इतर शहरातही अशा प्रकारे गुलालोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.