... पण गुलालाच्या तपासणीकडे अद्यापी दुर्लक्षच
गुलालातील भेसळी तपासणीकडे, अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्षच!
गुलाल हा अन्न, औषध प्रशासनाच्या यादीत मोडत नसल्याचे स्पष्टीकरण
स्थानिक व्यापाऱ्यांकडे नैसर्गिक गुलाल असल्याची माहिती
जोतिबावर विक्रीसाठी येणाऱ्या गुलालाची तपासणी आवश्यक
कोल्हापूरः दिलीप पाटील
महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवाच्या यात्रेत मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण केली जाते. यात्राकाळात व वर्षभरात अनेक टनांपर्यंत विक्री होणाऱ्या गुलालाची तपासणी करण्यात अन्न आणि औषध प्रशासनाने कायमच दुर्लक्ष केले आहे. किंबहुना या विभागाने जोतिबा डोंगरावर विक्री होणाऱ्या भेसळयुक्त गुलालावर कधी कारवाई केल्याचे दिसून आले नाही. ‘तरूण भारत संवाद’ने गुलालातील भेसळीवर प्रकाश टाकल्यानंतर हे चित्र पुढे आहे.
वाडी रत्नागिरीत जोतिबा डोंगरावर जोतिबाला भाविक '' जोतिबाच्या नावानं चांगभलं" च्या गजरात गुलाल, दौना, फुले अर्पण करतात, दर्शन घेतल्यावर प्रत्येकाच्या भाळी गुलाल लावतात. देवाच्या मुख्य चैत्री पौर्णिमेस होणाऱ्या यात्रेतील सासन काठीवर, पालखीवर, तसेच श्रावण षष्ठी यात्रेत याशिवाय पौर्णिमा व प्रत्येक रविवारी ‘श्री’च्या निघत असलेल्या पालखीवर गुलाल-खोबरे भाविक उधळत असतात. यावेळी भाविक अगदी गुलालात न्हावून निघतात, मंदिर आवारात व पालखी मार्गावर गुलालाचा खच पडला जातो.
या गुलालाची उधळण करत असताना त्याचा हवेतील पसरणारा धुस्कारा हा श्वसन नलिकेत जातो, भाविकांबरोबरच पुजारी, पालखीचे मानकरी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधिकारी, कर्मचारी, बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना या गुलालाचा कायमपणे त्रास होतो. तर महसूल, आरोग्य सेवेसह विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी यांना गुलालाचा त्रास होतो.
श्वसनाचे विकार, घसा दुखणे, अॅलर्जीक विकार होतात, अंगावर खाज येण्यासारखे अनेक त्रास यातून सर्वांना होतात. भाविक व प्रशासनात कार्यरत असलेले सर्वजण श्रध्देपोटी हा त्रास सहन करतात. जोतिबाच्या यात्रा तसेच इतर उत्सवाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित असतात, त्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी देखील असतात. त्यांच्यावर नेमकी या यात्रेत जबाबदारी काय असते, ते यात्रेत काय करतात, याचे उत्तर आजवर सापडलेले नाही.
जोतिबा डोंगरावर प्रसादाच्या साहित्याबरोबर गुलाल विकणारे स्थानिक व्यापारी आहेत. त्याच्याकडे विक्रीसाठी नैसर्गिक पद्धतीने तयार केलेला गुलाल असतो. प्रसादासह सर्व खाद्यपदार्थ स्थानिकांकडे चांगल्या प्रतीचे असतात. परंतु लाखो भाविक येत असल्यामुळे यात्रेत स्थानिक व्यापाऱ्यांपेक्षा बाहेरील व्यापारी गुलाल प्रसादाचे साहित्य विक्रीसाठी घेऊन येत असतात, या सर्वांकडे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या साहित्यांची तपासणी केली पाहिजे. या यात्रेत भेसळयुक्त गुलाल व प्रसाद तसेच खाद्यपदार्थाची सातत्याने अन्न, औषध प्रशासनाने तपासणी केल्यास भेसळयुक्त गुलालाची वस्तुस्थिती समोर येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.