गुलालाने केली ‘बोलती बंद’
बनावट गुलालाची रिअॅक्शन, अनेकांच्या स्वरयंत्राला सुज
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
निवडणुकीच्या निकालानंतर हा गुलालाने न्हाऊन निघाला. मिरवणूक मार्गावर कोपऱ्या कोपऱ्यावरून प्लास्टिकच्या पिशव्या भरून गुलाल फेकला जात होता. मिरवणूक संपवून हा घरी गेला. नाका, तोंडात गुलाल गेला, हे त्याला थोडे जाणवत होते. होईल थोडा त्रास, असे त्यांनी गृहीतही धरले होते. पण भलतेच घडत गेले. घशात गेलेल्या गुलालाचा त्याला त्रास होऊ लागला आणि धक्कादायक असे की त्याचा आवाज फुटायचा थांबला. सगळेजण घाबरून गेले. औषधोपचार सुरू झाले. आणि आज चार दिवसांनी त्याच्या तोंडातून एकेक शब्द फुटायला सुरुवात झाली. हा अनुभव कागलमधल्या शाहरुख जमादार व अन्य पाच-सहा जणांनी घेतला. तसेच निवडणूक निकालादिवशी चंदगडमध्ये गुलालानेच पेट घेतला. त्या भडक्याचा चटका पाच ते सहा जणांना बसला. आणि गुलालाचा असा विचित्र अनुभव आल्याने खरा गुलाल कोणता आणि बनावट गुलाल कोणता? हा मुद्दा अधिक ठळकपणे चर्चेत आला.
गुलालाच्या उधळणीची परंपरा जोतिबावर शेकडो वर्षें आहे. पण कधी गुलालाचा कोणाला त्रास झालेले नाही. एवढेच काय? आयुष्यभर गुलाल कपाळावर लावणाऱ्या पुजाऱ्याच्या कपाळावर कधी गुलालाची कणभरही रिअॅक्शन उमटलेली नाही. मग आत्ताच असा गुलाल कोठून येत आहे, त्यात घातक काय-काय घटक मिसळले जात आहेत, त्याच्या छाननीची गरज आहे. नाही तर कधीतरी मोठा अनर्थ हा बनावट गुलाल घडवून जाणार आहे.
कागलमध्ये शाहरुख जमादारने या चार दिवसांत अक्षरश: बोलती बंद करणारा अतिशय विचित्र अनुभव घेतला. शनिवारी हा प्रकार घडला. शनिवारी रात्री त्याला त्रास सुरू झाला व घसा दुखून बोलताना त्रास होऊ लागला. रविवारी सकाळी तर आवाजच बंद झाला. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. वेगवेगळ्या औषधांच्या गुळण्या करण्यात आल्या. त्यानंतर आज त्याला थोडे-फार बोलता येऊ लागले. गुलालात न्हाऊन निघाल्याने विचित्र अनुभवाला सामोरा गेलेला शाहरुख बनावट गुलालाची तपासणी करा, एवढे चार शब्द आज ‘तरुण भारत संवाद’शी कसेबसे बोलून गेला.
कोल्हापुरात बहुतेक गुलाल मुंबई, इस्लामपूर, पंढरपूर येथून येतो. तो गुलाल साबुदाण्याच्या पीठापासून केलेला असतो. रंगासाठी केमिकल असते, पण त्याचे प्रमाण ठरलेले असते. या गुलालाला मंद वासही असतो. आता बनावट गुलाल उग्र वासाचा असतो आणि मिरवणुकीत आता तो जेसीबीच्या बकेटमध्ये भरून मिरवणुकीवर ओतला जातो आणि असा मुक्तपणे उधळला जाणारा गुलाल अतिशय स्वस्तातला असतो. त्याचा त्रास नक्कीच होतो. चंदगडमध्ये तर उमेदवाराला ओवाळणाऱ्या महिलेल्या ताटातील निरांजनावर गुलाल पडल्यानंतर मोठा भडका उडाला. पण मोठा अनर्थ टळला.
कारण वाडी रत्नागिरीतील ज्योतिबा मंदिरात निरांजन, समया, उदबत्ती कायम असते. तेथे कधी असा गुलालाचा भडका उडण्याचा प्रकार घडला नाही. कारण तेथील गुलाल चांगला असतो. पण तरीही जोतिबा यात्रेच्या आधी यात्रेच्या माळावर ट्रक भरून बनावट गुलाल येतो व स्वस्त दरात तो विकला जातो. जोतिबावरील मूळ व्यापाऱ्यांनीच अशा गुलाल विक्रीला जोतिबावर विरोध केला आहे. आता या महिन्यात सौंदत्ती यात्रा आहे. कोल्हापुरातून 30 ते 40 हजार भाविक सौंदत्तीला जाणारे जातात. तेथेही ते भंडारा उधळतात. अलीकडे या भंडाऱ्याचाही रंग बदलला आहे. मूळ भंडाऱ्याचा पिवळा रंग हरवला आहे. त्यामुळे गुलालापाठोपाठ या भंडाऱ्याची छाननी करणे गरजेचे आहे.
प्रशासनाला कळवले..
बनावट गुलाल विकण्याचा प्रकार नक्कीच चालू आहे. पण जोतिबावर तो कोणी विकणार नाही, याची खबरदारी आम्ही जोतिबावरील व्यापारी घेतो. यात्रेच्या धामधुमीत मात्र काही जण बाहेर येऊन असा गुलाल विकतात. आम्ही व्यापाऱ्यांनी अशा बनावट गुलालाचा मुद्दा यापूर्वीच प्रशासनापर्यंत पोहोचवला आहे.
आनंद लादे , अध्यक्ष, जोतिबा पुजारी व जोतिबा व्यापारी असोसिएशन
स्वरयंत्राला सुज
रंगातले घातक घटक स्वरयंत्राला श्वासनलिकेला अतिशय घातक असतात. त्यामुळे स्वर यंत्राला सूज येते व आवाज काही काळासाठी बंद होतो. फुफ्फुसात गुलाल, रंग गेला तर धाप लागते. त्यामुळे अशा प्रसंगात नाकाला रुमाल आवश्यकच आहे. काही दुर्घटना झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आधीच घेतलेली खबरदारी अतिशय महत्त्वाची आहे.
डॉ. अजित लोकरे,विभागप्रमुख नाक, कान, घसा विभाग सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर