आसामच्या राज्यपालपदी गुलाबचंद कटारिया
मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा शपथविधी सोहळय़ात सामील
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
राजस्थान विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपचे मातब्बर नेते गुलाबचंद कटारिया यांनी बुधवारी आसामचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे. आसामचे मुख्य न्यायाधीश संदीप मेहता यांनी गुवाहाटीत कटारिया यांना या पदाची शपथ दिली आहे. यादरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, राजस्थान भाजप अध्यक्ष सतीश पुनिया, भाजप नेते राजेंद राठोड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
कटारिया यांनी आसामचे 31 वे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. यापूर्वीचे राज्यपाल जगदीश मुखी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने कटारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 12 फेब्रुवारी रोजी आसामचे राज्यपाल म्हणून कटारिया यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. कटारिया यांनी राजस्थानमधील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरीही भाजपला या पदावर अन्य कुणा नेत्याची नियुक्ती करता आलेली नाही. राजस्थानात भाजपमध्ये गटबाजी असल्याचे मानले जाते. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे तसेच केंद्रीय मंत्री गजेंद्र गेहलोत यांच्यात राज्यातील नेतृत्वावरून चढाओढ सुरू असल्याची चर्चा आहे. याचमुळे नव्या विरोधी पक्ष नेत्याची निवड अद्याप झालेली नसावी.
गुलाबंद कटारिया हे महाविद्यालयीन काळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. प्रारंभी जनसंघासाठी त्यांनी काम केले होते. राजस्थानात पक्षाचा विस्तार करण्यात त्यांची मोठी भूमिका राहिली आहे. कटारिया हे 1993 पासून सातत्याने आमदार म्हणून निवडून आले आहेत. उदयपूर विधानसभा मतदारसंघात ते सलग चारवेळा जिंकले आहेत.