गुकेशची नेपोम्नियाचीविरुद्धची लढत बरोबरीत
वृत्तसंस्था/ सेंट लुईस, अमेरिका
जागतिक विजेतेपदाचा आव्हानवीर भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशचा रशियाच्या इयान नेपोम्नियाचीविरुद्धचा सामना रोमहर्षक पद्धतीने बरोबरीत संपला. यंदाच्या ग्रँड चेस टूरमधील अंतिम स्पर्धा असलेल्या सिंकफिल्ड चषकाच्या दुसऱ्या फेरीनंतर दोन्ही खेळाडू संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर विसावले आहेत.
विद्यमान विश्वविजेता चीनच्या डिंग लिरेन याच्याशी तुलनेने सहज बरोबरी साधल्यानंतर गुकेशचा मंगळवारी नेपोम्नियाचीविऊद्धचा सामना उत्कंठावर्धक झाला. पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना गुकेशने बहुतेक वेळ चांगला खेळ केला. परंतु दोनदा कँडिडेट्स स्पर्धा जिंकलेल्या नेपोम्नियाचीने सामना बरोबरीत सोडविताना सुरेख पद्धतीने बचाव आणि प्रतिआक्रमण केले. हा सामना 60 चाली इतका चालला.
ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदनेही फ्रान्सच्या मॅक्झिम वॅचियर-लॅग्रेव्हसोबत बरोबरी साधली. काळ्या सोंगाट्या घेऊन खेळणाऱ्या प्रज्ञानंदसाटी हा आणखी एक इटालियन ओपनिंग गेम होता, पण भक्कम वॅचियर-लॅग्रेव्हविऊद्ध त्याला कोणतीही संधी मिळाली नाही. सुऊवातीच्या फेरीतील एकमेव निर्णायक गेममध्ये फ्रान्सच्या अलिरेझा फिरोजाने अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या फेरीचा दिवस पूर्णपणे अनिर्णीत राहिला. फिरोजाने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हबरोबरचा, तर डच खेळाडू अनीश गिरीने डिंग लिरेनविरुद्धचा सामना बरोबरीत सोडविला.
वेस्ली सो आणि काऊआना या दोन अमेरिकी खेळाडूंमधील सामना देखील अनिर्णीत राहिला. फिरोजा 1.5 गुणांसह आघाडीवर असून प्रत्येकी एका गुणासह आठ खेळाडू त्याच्या मागे आहेत. अर्ध्या गुणासह काऊआना सध्या 10 खेळाडूंच्या राऊंड-रॉबिन स्पर्धेत तळाशी आहे.