अर्जुन एरिगेसीला नमवून गुकेश दुसऱ्या स्थानावर
वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंजर (नॉर्वे)
विद्यमान विश्वविजेता डी. गुकेशने प्रतिकूल परिस्थितीचे संधीत रूपांतरित करणे सुरूच ठेवले असून त्याने कठीण परिस्थितीतून बाहेर पडून क्लासिकल चेस खेळात पहिल्यांदाच सहकारी अर्जुन एरिगेसीला हरवले आणि नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या 7 व्या फेरीनंतर दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.
या प्रतिष्ठित सहा खेळाडूंच्या दुहेरी साखळी स्पर्धेतील गुकेशच्या आतापर्यंतच्या वाटचालीतून दिसून आल्याप्रमाणे त्याने पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना आर्मागेडन टायब्रेकच्या कठीण परिस्थितीतून जावे लागण्याचा प्रसंग न आणता सलग दुसरा विजय मिळविण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि दुसऱ्या फेरीत एरिगेसीविऊद्ध झालेल्या पराभवाचा गोड बदला घेतला. गतविजेता आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला नमविल्यानंतरच्या या विजयामुळे 19 वर्षीय गुकेशने 11.5 गुणांसह गुणतालिकेत 34 वर्षीय नॉर्वेजियन खेळाडूला मागे टाकले आहे.
विज्क अॅन झी येथील टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत गुकेशला हरवून त्याच्या जेतेपदाच्या संधी हिरावून घेणाऱ्या एरिगेविऊद्धच्या तीन सामन्यांतील गुकेशचा हा पहिलाच विजय होता. स्पर्धेच्या आणखी तीन फेऱ्या बाकी असताना अव्वल क्रमांकावर अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो काऊआना असून त्याने चीनच्या वेई यीचा पराभव केला. कारुआनाचे 12.5 गुण झाले आहेत. अन्य एक अमेरिकन ग्रँडमास्टर आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिकारू नाकामुराविऊद्धच्या आर्मागेडनमधील विजयानंतर कार्लसन 11 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. नाकामुरा 8.5 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पराभवानंतर एरिगेसी 7.5 गुणांसह पाचव्या स्थानावर घसरला आहे, तर वेई यी 6.5 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
खेळाच्या पहिल्या साडेतीन तासांपर्यंत गुकेश बचावात्मक खेळ करत राहिला होता, परंतु शेवटी त्याने आपला खेळ उंचावून विजय मिळवला आणि प्रतिस्पर्ध्याला वेळेच्या अडचणीत टाकले. एरिगेसी थोडासा अडखळला, ज्यामुळे गुकेशला एक संधी मिळाली. त्याचा त्याने फायदा घेतला आणि चुरशीच्या खेळानंतर त्याच्या प्रतिस्पर्ध्याला नमते घेण्यास भाग पाडले. ‘मी हळूहळू हार मानत चाललो होतो. सुऊवातीपासून काहीही माझ्या मनासारखे झाले नाही. पण एकदा अशा स्थानावर पोहोचल्यानंतर मी फक्त योग्य चाली करत राहण्याची गरज होती’, असे गुकेशने सामन्यानंतर सांगितले.
गुकेशचे पोलिश प्रशिक्षक ग्रझेगोर्झ गाजेव्हस्की यांना एरिगेसीविरुद्धचा विजय कार्लसनवरील विजयापेक्षा मोठा होता का, असे विचारण्यात आले. कारण गुकेशने कधीही क्लासिकल खेळामध्ये त्याला यापूर्वी हरवले नव्हते. त्यावर प्रशिक्षक म्हणाले की, निश्चितच एरिगेसी हा खूप कठीण प्रतिस्पर्धी आहे, परंतु मी दोन्ही सामन्यांची तुलना करणार नाही. मॅग्नसशी कुठल्याही बाबतीत तुलना होण्यासाठी तुम्हाला खरोखर बरेच काही साध्य करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कार्लसन विऊद्ध नाकामुरा हा सामनाही रंजक ठरला. कारण दोन्ही खेळाडूंनी फक्त 21 चालींनंतर बरोबरी साधली. दोघांचेही सुमारे दीड तास शिल्लक होते. त्यानंतर आर्मागेडनमध्ये कार्लसनने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूला हरवून 1.5 गुण मिळवले.
महिला विभागात युक्रेनियन ग्रँडमास्टर अॅना मुझीचुकने आर्मागेडन टायब्रेकमध्ये दोन वेळची जागतिक रॅपिड चॅम्पियन कोनेरू हम्पीला हरवले, तर ग्रँडमास्टर आर. वैशालीने चीनच्या लेई टिंगजीविऊद्ध वेळेच्या अडचणीत सापडून पराभव पत्करला. या विभागात जू वेनजुन 11.5 गुणांसह आघाडीवर आहे, त्यानंतर मुझीचुकला स्थान मिळालेले आहे.