गुकेशने काढला वचपा, कार्लसनला दणका
वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंजर
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत मॅग्नस कार्लसनचा पुरेपूर वचपा काढताना विद्यमान विश्वविजेता डी. गुकेशने त्याच्यावर मात केली. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कार्लसनला क्लासिकल चेस सामन्यात गुकेशने हरविण्याची ही पहिलीच खेप असून नॉर्वेच्या खेळाडूने केलेल्या चुकीचा फायदा उठवत त्याने त्याला पराभूत केले.
या विजयामुळे 19 वर्षीय गुकेश 8.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे आणि तो संयुक्तपणे आघाडीवर असलेल्या कार्लसन आणि अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो काऊआनापेक्षा फक्त एक गुणाने दूर आहे. चीनच्या वेई यीविऊद्ध आर्मागेडन टायब्रेकमध्ये विजय मिळवल्यानंतर अर्जुन एरिगेसी हिकारू नाकामुरासह 7.5 गुण मिळवून चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत जवळजवळ सर्व सहा खेळाडूंना प्रतिष्ठित विजेतेपद जिंकण्याची संधी आहे.
पाच वेळा जगज्जेता राहिलेला कार्लसन जवळजवळ चार तास चाललेल्या या लढतीत वरचढ ठरला होता, परंतु वेळेच्या अडचणीपोटी झालेल्या एका गंभीर चुकीमुळे गुकेशने या नॉर्वेजियन खेळाडूवर मात केली आणि उल्लेखनीय विजय मिळवला. कार्लसनला त्याची चूक लक्षात आली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नॉर्वेजियन स्टारने टेबलावर हात आदळून आपली निराशा व्यक्त केली, ज्यामुळे बुद्धिबळाच्या सोंगाट्या अस्ताव्यस्त पडल्या. गुकेशशी हस्तांदोलन करताना त्याच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होते. नंतर सर्व सोंगाट्या त्याने पटावर ठेवल्या आणि विजेत्याच्या पाठीवर थाप मारून तो निघून गेला.
या कामगिरेमुळे गुकेश क्षणभर डोळे बंद करून समाधानाच्या भावनेत रमला. पहिल्या फेरीत नॉर्वेजियन खेळाडूकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे परतीच्या लढतीत गुकेश कार्लसनच्या आव्हानावर मात करू शकेल की नाही असा प्रश्ऩ निर्माण झाला होता. काळ्या सोंगाट्यांसह खेळणाऱ्या कार्लसनने परिपूर्ण अचूकता दाखवत गुकेशला मागे टाकले होते. परंतु भारतीय खेळाडू टिकून राहण्याच्या दृष्टीने योग्य चाली शोधून खेळ लांबवत राहिला.
‘मी फार काही करू शकत नव्हतो. सुदैवाने तो (कार्लसन) वेळेच्या अडचणीत अडकला’, असे गुकेशने सामन्यानंतर सांगितले. एक भाग्यवान दिवस, असेही तो नंतर म्हणाला. गुकेशचे पोलिश प्रशिक्षक ग्रझेगोर्झ गाजेव्हस्की म्हणाले की, हा विजय विश्वविजेत्यासाठी खूप आत्मविश्वास वाढवणारा आहे. दरम्यान, महिला विभागात या स्पर्धेत आणखी एक चुरशीचा दिवस पाहायला मिळाला, ज्यामध्ये आर. वैशालीने आर्मागेडन टायब्रेकमध्ये कोनेरू हम्पीला हरवले.