‘रॅपिड’च्या अखेरीस गुकेशला मोठी आघाडी
वृत्तसंस्था/ झाग्रेब, क्रोएशिया
जागतिक विजेता डी. गुकेशने ग्रँड चेस टूरचा भाग असलेल्या सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ स्पर्धेच्या रॅपिड विभागाच्या नवव्या आणि शेवटच्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सोवर सुरेख विजय मिळवून आपल्या मोहिमेचा शेवट केला. दुसऱ्या दिवशी सलग पाच विजय मिळवल्यानंतर गुकेशने तिसऱ्या दिवशी दोन सामने बरोबरीत सोडविले आणि अखेर वेस्लीला हरवून संभाव्य 18 पैकी 14 गुण मिळवले.
एकंदरित रॅपिडमध्ये एकूण दोन सामने त्याने बरोबरीत सोडविले, पोलंडच्या डुडा जान-क्रिज्स्टोफविऊद्ध पराभव पत्करावा लागला आणि सहा विजय नोंदविले. रॅपिड गटात प्रत्येक विजयासाठी दोन गुण मिळवत या भारतीय स्टार खेळाडूने आता डुडावर चांगली आघाडी घेतली आहे. डुडाने पहिले दोन गेम बरोबरीत सोडविले आणि दिवसातील तिसरा सामना देखील बरोबरीत सोडवण्यास तो सज्ज झाला होता.
ब्लिट्झ विभागात अजून 18 फेऱ्या बाकी असताना गुकेशने 1,75,000 अमेरिकन डॉलर्सच्या बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत डुडावर तीन गुणांची आघाडी घेतली आहे. या स्पर्धेतील विजेत्यासाठीचे बक्षीस 40,000 अमेरिकन डॉलर्स इतके आहे. गुकेशसाठी दिवसाची सुऊवात डचमन अनीश गिरीविऊद्धच्या बरोबरीच्या निकालाने झाली. दोन्ही बाजूंनी फारशी प्रगती करता आली नाही म्हणून खेळाडूंनी हस्तांदोलन केले आणि सामना बरोबरीत सोडविला. दुसरा सामना गुकेशसाठी खरोखरच मनोरंजक ठरला. कारण त्याने इव्हान सारिचविऊद्ध मार्शल गॅम्बिटचा वापर केला आणि सामना बरोबरीत सुटण्यापूर्वी मॅरेथॉन 87 चाली इतका चालला.
तिसऱ्या सामन्यात वेस्ली सोचे आव्हान जास्त काळ टिकले नाही. कारण गुकेशने फक्त 36 चालींमध्ये त्यात विजय नोंदविला. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनने अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाविऊद्ध दोन पूर्ण गुणांसह सुऊवात केली, परंतु नंतर उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हशी बरोबरी साधावी लागल्याने अग्रस्थानाच्य जवळ पोहोचण्याच्या त्याच्या आशा संपल्या. स्पर्धेतील दुसरा भारतीय आर. प्रज्ञानंदने सातव्या फेरीत सारिचचा पराभव केला आणि वेस्ली सो तसेच डुडाशी बरोबरी साधली.