गुकेशला पराभवाचा धक्का, अरविंदची बरोबरी
वृत्तसंस्था/ प्राग
प्राग येथे सुरू असलेल्या प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवाच्या मास्टर्स विभागात तिसऱ्या फेरीत जागतिक विजेता डी. गुकेशला हॉलंडच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला, तर अरविंद चिदंबरमने इराणच्या परहम मॅगसुदलूसोबत बरोबरी साधली.
स्पर्धेत अजूनही त्याच्या पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या गुकेशला व्हॅन फॉरेस्टविऊद्ध कधीही लय सापडली नाही आणिभारतीय खेळाडू लवकरच प्रचंड दबावाखाली आला. हा खेळ 48 चाली इतका चालून शेवटी फॉरेस्टची सरशी झाली. फॉरेस्टने संयुक्त आघाडी पुन्हा मिळवली आहे आणि तिन्ही लढती निर्णायक ठरलेला तो या स्पर्धेतील एकमेव खेळाडू आहे. दोन गुणांसह फोरेस्ट हा उझबेक जोडी नोदिरबेक याकुबबोएव्ह आणि नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह तसेच स्थानिक खेळाडू डेव्हिड नवारा यांच्यासह आघाडीवर आहे.
10 खेळाडूंच्या व 9 फेऱ्यांच्या स्पर्धेत अद्याप सहा फेऱ्या शिल्लक असताना गुकेश अव्वल मानांकित जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर,श अमेरिकेचा हान्स मोके निमन आणि मॅगसुदलू यांच्यासह सातव्या स्थानावर आहे. या तिन्ही खेळाडूंनी त्यांच्या तीन सामन्यांत एक गुण मिळवला आहे. दुसरा भारतीय खेळाडू अरविंदने मॅगसुदलूशी बरोबरी साधली आणि स्पेनच्या डेव्हिड आंतोन गुइजारोच्या बरोबरीने त्याचे गुण 1.5 पर्यंत पोहोचवले.
चॅलेंजर्स विभागात भारतीयांसाठी दुहेरी धक्का बसला. कारण दिव्या देशमुख आणि सूर्यशेखर गांगुली या दोघांनाही हार पत्करावी लागली. महिला विश्वचषक विजेत्या दिव्याला चीनच्या जिनेर झूविऊद्ध पराभव पत्करावा लागला, तर गांगुलीला झेक प्रजासत्ताकच्या जॅकिम नेमेचचे आव्हान जड गेले. पहिल्या तीन फेऱ्यांनंतर गांगुलीचा अर्धा गुण आहे, तर दिव्याचा एक गुण झाला आहे. झेक प्रजासत्ताकचा फिनेक व्हॅक्लाव्ह 2.5 गुणांसह या विभागात आघाडीवर आहे.