For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुकेशची गगनभरारी

06:42 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुकेशची गगनभरारी
Advertisement

प्रतिष्ठेच्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद प्राप्त करण्याची डी. गुकेश याची कामगिरी ही ऐतिहासिकच म्हटली पाहिजे. टोरांटोत पार पडलेल्या या स्पर्धेत त्याने ज्या दर्जाचा खेळ केला, तो अतिशय सरस व अफलातूनच म्हणावा लागेल. स्वाभाविकच गुकेशच्या या अजिंक्यपदाचा समस्त भारतवासीयांना झालेला ‘आनंद’ अवर्णनीयच असाच ठरावा. वास्तविक, बुद्धिबळ या खेळाच्या नावातच त्या खेळाचे वैशिष्ट्या दडलेले आहे. या खेळात बुद्धीचा अक्षरश: कस लावावा लागतो. कमालीची एकाग्रता, अष्टावधानी दृष्टीकोन बाळगतानाच प्रतिस्पर्ध्याच्या चालींचा अचूक अंदाज घेणे आवश्यक असते. त्याचबरोबर संयम व आक्रमकतेचा मिलाफ साधत संबंधितास आपल्या चालीतून कोंडीतही पकडावे लागते. बुद्धीच्या या लढाईत मानसिक क्षमता पणाला लागते. गुकेशने या सर्वच पातळ्यांवर आपले असामान्यत्व सिद्ध केल्याचे दिसून येते. मुख्य म्हणजे वयाच्या केवळ 17 व्या वर्षी कँडिडेट्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याने ‘आजवरचा सर्वांत युवा बुद्धिबळपटू,’ अशी नोंद त्याच्या नावावर होणे, हा देशाचा बहुमान ठरतो. महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव याने विसाव्या वर्षी ही स्पर्धा जिंकण्याची किमया केली होती. त्याला आता जवळपास 40 वर्षे उलटून गेली आहेत. मॅग्नस कार्लसन व मिखाईल तालने 22 व्या वर्षी, अनातोली कार्पोवने 23 व्या वर्षी या स्पर्धेवर जेतेपदाची मोहोर उमटविली होती. हे पाहता त्याचे यश नजरेत भरते. तसे पाहिल्यास या स्पर्धेतला बॉबी फिशरनंतरचा तो सर्वांत युवा बुdिद्धबळपटू. 15 व्या वर्षी बॉबी ही स्पर्धा खेळला. परंतु, पदार्पणात त्याला ही स्पर्धा जिंकता आली नाही. त्यासाठी त्याला आणखी 14 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. गुकेशने हे लक्ष्य पहिल्याच प्रयत्नात साध्य केले. याचे श्रेय त्याच्या मेहनतीस व सकारात्मक दृष्टीकोनास जाते. गुकेशने म्हटल्याप्रमाणे एकूणच स्पर्धेत त्याचा खेळ चांगलाच झाला. पाच विजय, आठ बरोबरी व एक पराजय अशी त्याची कामगिरी राहिली. त्यातला अफिरेझा फिऊझाविऊद्धचा पराभव जिव्हारी लागणारा होता. तथापि, आपले मनोबल ढळू न देता गुकेशने सर्वस्व पणाला लावले व विजयश्री खेचून आणली. हार वा जीत हा कोणत्याही खेळाचा भागच आहे. मात्र, लढण्याची जिद्द महत्त्वाची असते. चौसष्ट घरांच्या या राजाने ही मानसिकता ठेवल्याने त्याला ही फिनिक्स भरारी घेता आली, असे म्हणावे लागेल. कुठलाही भारतीय ही स्पर्धा यंदा जिंकेल, असे वाटत नाही, असे विधान मॅग्नम कार्लसनने केले होते. परंतु, भारताच्या या युवा बुद्धिबळपटूने आपल्या खेळातूनच मॅग्नसला काय ते उत्तर दिले. त्यामुळे मॅग्नसलाही या युवा भारतीय खेळाडूच्या खेळावर कौतुकसुमनांचा वर्षाव करणे भाग पडले. गुकेशचा हा प्रवास तसा थक्क करणारा म्हणता येईल. तोही बुद्धिबळपटूंची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेन्नईचाच. वडील डॉक्टर, तर आई सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. सातव्या वर्षांपासूनच त्याने बुद्धिबळाचे धडे गिरवायला सुऊवात केली आणि या खेळाविषयीची गोडी दिवसागणिक वाढत गेली. आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या अजिंक्यपदाबरोबरच आशियाई युवक चँपियनशीपमध्ये त्याने पाच सुवर्णपदकांची कमाई केली. तर वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब पटकावला. तथापि, सर्वांत कमी वयात ग्रँडमास्टर होण्याचे त्याचे स्वप्न मात्र भंगले. किंबहुना, त्यानंतर अवघ्या पाच वर्षांत अनेक नामांकितांना नमवत तो मैलाचा दगड पार करतो, हे खरोखरच असाधारण होय. यापूर्वी विश्वनाथ आनंदलाच केवळ अशा स्वऊपाची कामगिरी करता आली आहे. आनंद यांच्यानंतरचा तो दुसरा भारतीय ठरला आहे. हे लक्षात घेतले, की त्याच्या कामगिरीचे मोल लक्षात येते. प्रत्येकाच्या खेळाची म्हणून काही वैशिष्ट्यो वा बलस्थाने असतात. तशी त्याची म्हणूनही एक शैली असते. गुकेशबाबत बोलायचे झाल्यास अभिजातता हा त्याच्या खेळाच्या विशेष मानावा लागेल. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे झाले आहे. स्वाभाविकच सर्वच खेळांमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. बुद्धिबळ हा मानसिक बैठक असलेला खेळ. त्यामुळे त्यात तंत्रज्ञानाचा मोठा वापर होताना दिसतो. परंतु, संगणकापेक्षा निसर्गदत्त बुद्धिकौशल्यावर भिस्त बाळगणे गुकेशने पसंत केले. कॉम्प्युटरचा कमीत कमी वापर करतानाच स्वयंप्रज्ञेला प्राधान्य देण्याची अभिजात शैली हेदेखील म्हणूनच त्याच्या यशाचे गमक मानले जाते. तो आजच्या काळातील सर्व बुद्धिबळपटूंसाठी आदर्शवत ठरावा. आता बुद्धिबळाचा जगज्जेता होण्याची संधीही गुकेशकरिता उपलब्ध असेल. जगज्जेतेपदाकरिता गुकेशची लढत चीनच्या डिंग लिरेनशी होईल. ही लढत या वर्षाअखेरीस होईल. भारत आणि चीन या दोन देशांमधील संघर्ष नवा नाही. आता बुद्धिबळाच्या पटावरही हे दोन देश परस्परांना भिडतील. चिनी विश्वविजेता डिंग हा कसलेला बुद्धिबळपटू म्हणून प्रसिद्ध आहे. गुकेशपेक्षा तो 14 वर्षांनी मोठा आहे. त्यामुळे या दोघांमधील सामना कसा होईल, याकडे अवघ्या जगाचे लक्ष असेल. कँडिडेट्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याने गुकेशचे मानांकन गुण 2763 इतके झाले आहेत. त्याने डिंग लिरेनबरोबरच अर्जुन एरिगेसीलाही मागे टाकले आहे. भविष्यातही त्याला हाच फॉर्म टिकवावा लागेल. मागच्या काही वर्षांत भारतीय बुद्धिबळपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान कामगिरी केल्याचे पहायला मिळते. ही कामगिरी समस्त भारतीयांसाठी सुखावणारीच ठरते. प्रामुख्याने तामिळनाडूतील हे खेळाडू आहेत. चेन्नईचे हे बुद्धीवैभव हेवा वाटावा असेच. हा चेन्नई पॅटर्न देशाच्या इतर भागांतही कसा पोहोचविता येईल, देशात चांगले बुद्धिबळपटू कसे घडविता येतील, या दृष्टीने देशाच्या क्रीडा विभागाने प्रयत्न केले पाहिजेत. कोणत्याही खेळासाठी साधनसुविधांची सज्जता हा अत्यंत महत्त्वाचा विषय होय. याबाबत आगामी काळात ठोस पावले उचलली गेली तर, या स्तरावर असेच पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू शकतात. विश्वनाथ आनंदने जगज्जेतेपद पटकावून भारताचा तिरंगा जगभर फडकवला. आता गुकेशकडूनही तीच अपेक्षा असेल.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.