गुकेश, प्रज्ञानंदचे पुनरागमन, ‘नॉर्वे चेस’मध्ये भारताच्या आशा पुन्हा पल्लवित
वृत्तसंस्था
ओस्लो : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत भारताच्या युवा ताऱ्यांनी दमदार पुनरागमन केले. डी. गुकेश आणि आर. प्रज्ञानंद यांनी अत्यंत महत्त्वाचे विजय मिळवले, तर दिव्या देशमुखने मागील फेरीतील अपयशातून सावरत आपलीच सहकारी कोनेरू हम्पीचा पराभव केला. ओस्लो येथे सुरू असलेल्या ‘नॉर्वे चेस’ स्पर्धेतील विजेतेपदाची शर्यत निर्णायक टप्प्यात पोहोचली असताना या कामगिरीमुळे भारताचे आव्हान पुन्हा जोमाने उभे राहिले आहे.
विश्वविजेता गुकेशने अमेरिकन ग्रँडमास्टर वेस्ली सोविऊद्धच्या लढतीतून 1.5 गुण मिळवले. ‘क्लासिकल’ सामन्यात विजयाची संधी हातातून निसटल्यानंतरही त्याने आर्मागेडन टायब्रेकरमध्ये विजय मिळवत एकूण गुणांची संख्या आठवर नेली. असे असले तरी, सहा खेळाडूंच्या ‘डबल राउंड-रॉबिन’ गुणतालिकेत तो तळाच्याच स्थानावर कायम राहिला आहे. दुसरीकडे, प्रज्ञानंदने फ्रेंच ग्रँडमास्टर अलीरेझा फिरौझाला सलग दुसऱ्यांदा ‘क्लासिकल’ सामन्यात पराभूत केले. या विजयासह त्याने पूर्ण तीन गुण मिळवले आणि आपली एकूण गुणसंख्या नऊवर नेली. मात्र या विजयामुळे गुणतालिकेतील स्थितीत फारसा बदल झाला नाही. हा युवा भारतीय ग्रँडमास्टर पाचव्या आणि गुकेश सहाव्या स्थानावरच कायम राहिले आहेत. तरीही हे दोन्ही भारतीय खेळाडू गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या खेळाडूंच्या अगदी जवळ आहेत. अजून तीन फेऱ्या बाकी असल्याने स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात ते जोरदार मुसंडी मारू शकतात.
वेस्ली सो 12.5 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम राहिला आहे, तर अलीरेझा 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. प्रज्ञानंद, विश्वविजेता मॅग्नस कार्लसन आणि जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर या तीन खेळाडूंचा समावेश असलेला एक अत्यंत चुरसपूर्ण गट 9 गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. यामुळे स्पर्धेच्या अंतिम तीन फेऱ्यांमध्ये विजेतेपदाची शर्यत पूर्णपणे खुली आणि रोमांचक बनली आहे. कार्लसनने आर्मागेडन टायब्रेकरमध्ये कीमरचा पराभव करत विजेतेपदाच्या शर्यतीतील आपले स्थान अधिकच भक्कम केले आहे.
दरम्यान, पांढरे मोहरे घेऊन खेळणाऱ्या गुकेशने स्वत:साठी विजयाची स्थिती निर्माण केली होती. मात्र सोकडे घड्याळात एक तास शिल्लक असताना गुकेशकडे केवळ 18 मिनिटे उरली होती. वेळेची ही तीव्र कमतरता त्याला महागात पडली. याचा फायदा घेत त्या अमेरिकन खेळाडूने भक्कम बचाव केला आणि ‘क्लासिकल’ सामन्यात बरोबरी करण्यास गुकेशला भाग पाडले. तरीही जागतिक विजेत्या गुकेशने आर्मागेडन टायब्रेकरमध्ये या नुकसानाची भरपाई केली. पांढरे मोहरे घेऊन खेळणाऱ्या प्रज्ञानंदने 26 व्या चालीपर्यंत सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि हळूहळू आपली पकड अधिक घट्ट केली. अलीरेझावर वेळेचा दबाव वाढत असताना या भारतीय खेळाडूने प्रतिस्पर्ध्याच्या कमकुवत बाजूंचा सतत वेध घेतला आणि सामन्याच्या एका निर्णायक क्षणी जोरदार हल्ला चढवला.
दिव्या देशमुखनेही पुन्हा एकदा आपल्या निर्भीड खेळाचे प्रदर्शन घडविले. गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या बिबिसारा असाउबायेव्हापेक्षा केवळ एका गुणाने मागे असलेल्या दिव्याने अनुभवी कोनेरू हम्पीविऊद्धचा सामना जिंकून विजेतेपदाच्या शर्यतीतील आपले भक्कम स्थान राखण्यात यश मिळविले आहे. हम्पी व दिव्या याच्ंयातील ‘क्लासिकल’ सामना बरोबरीत सुटला, परंतु दिव्याने आर्मागेडन’ टायबेक्ररमध्ये निर्णायक चाल खेळत विजय मिळवला.