गुकेशचे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत पुनरागमन, प्रज्ञानंदवर मात
त. भा. प्रतिनिधी
ओस्लो : विसावे वर्ष लागल्यानंतर एका दिवसाने गुकेशने आपला उत्साह आणि हास्य दोन्ही पुन्हा मिळवले. त्याने एका रोमांचक क्लासिकल लढतीत आपलाच देशबांधव प्रज्ञानंदला पराभूत करून तीन पूर्ण गुण मिळवले आणि येथी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील आपली मोहीम नव्या उत्साहाने सुरू केली.
दुसरीकडे, विद्यमान विजेता मॅग्नस कार्लसनच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत, कारण तो अमेरिकन ग्रँडमास्टर वेस्ली सोकडून पराभूत झाला. यामुळे पाच फेऱ्यांनंतर जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला हा खेळाडू सहा खेळाडूंच्या गटात तळाशी पोहोचला आहे. या विजयामुळे सो 8.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तो स्पर्धेत आघाडीवर असलेल्या अलीरेझा फिरौजाच्या मागे आहे. फिरौजाने 10 गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले असून आतापर्यंत स्पर्धेवर वर्चस्व गाजवले आहे.
आता 6.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या मुकेशच्या आव्हानात या विजयाने जणू काही पुन्हा प्राण फुंकले आहेत. खचाखच भरलेल्या स्पर्धा स्थळावरील चाहत्यांनी ऑटोग्राफ, सेल्फी आणि छायाचित्रांसाठी विश्वविजेत्याभोवती गर्दी केली. गेल्या काही कठीण दिवसांनंतर गुकेश स्वत: खूपच निवांत दिसला. निराशाजनक निकालांनंतर तो अनेकदा शांतपणे खेळण्याच्या हॉलमधून बाहेर पडत असे. सहा गुणांसह प्रज्ञानंद चौथ्या स्थानावर कायम असून जर्मन ग्रँडमास्टर व्हिन्सेंट कीमर पाच गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
संपूर्ण भारतीयांमधील सामना अत्यंत रोमांचक ठरला, ज्यात दोन्ही खेळाडूंमध्ये सामन्याची गती सतत बदलत गेली. दोघांनाही जिंकण्याची संधी होती, पण अखेरीस सर्वांत महत्त्वाच्या क्षणी गुकेशने आपला संयम राखला. रागोझिन डिफेन्सपासून सुरू झालेला हा डाव सुऊवातीला प्रज्ञानंदच्या बाजूने झुकलेला दिसत होता. तरीही गुकेश अविचलित राहिला. शेवटच्या टप्प्यात वाढत्या दबावाखाली प्रज्ञानंदकडून एक महागात पडणारी चूक झाली आणि त्याने गुकेशला हवी असलेली संधी आयतीच बहाल केली. जागतिक विजेत्याने या संधीवर निर्णायकपणे झडप घातली आणि तिचे रूपांतर एका वेगवान ’चेकमेट’ हल्ल्यात केले. गुकेशने या सामन्याचे वर्णन ‘केवळ एक अत्यंत गुंतागुंतीचा सामना’ असे केले आणि हसत-हसत पुढे जोडले, ‘सुदैवाने माझ्या काही युक्त्या माझ्या पथ्यावर पडल्या’.
कार्लसनचा पराभव करून सोने विजेतेपदाच्या शर्यतीतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. आणखी एक विजय त्याला गुणतालिकेतील अव्वल खेळाडूशी बरोबरी करण्याच्या स्थितीत नेऊन ठेवेल. महिला गटात दिव्या देशमुखने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. ‘स्पीडबोट’वर घालवलेल्या एका दिवसानंतर महिला विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या पटावरही तोच वेग कायम राखला. एका क्लासिकल सामन्यात चीनच्या झू जिनरचा पराभव करून तिने तीन गुण मिळवले आणि 8.5 गुणांसह सहा खेळाडूंच्या गुणतालिकेत पहिल्यांदाच अव्वल स्थान गाठले.