For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुकेश पराभूत झाल्याने दुसऱ्या स्थानावर, प्रज्ञानंदची बरोबरी

06:45 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुकेश पराभूत झाल्याने दुसऱ्या स्थानावर  प्रज्ञानंदची बरोबरी
Advertisement

वृत्तसंस्था/ टॉरंटो

Advertisement

कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर डी. गुकेशला फ्रान्सच्या फिरोझा अलीरेझाच्या हातून पहिला पराभव पत्करावा लागला असून त्यामुळे तो संयुक्तरीत्या विराजमान झालेल्या अव्वल स्थानावरून घसरला आहे. दुसरीकडे, आर. प्रज्ञानंदने सातव्या फेरीत अमेरिकन फॅबियानो काऊआनासोबत सहज बरोबरी साधली. 17 वर्षीय गुकेश, काऊआना आणि प्रज्ञानंद हे चार गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.

रशियाच्या इयान नेपोम्नियाचीने अमेरिकेच्या हिकारू नाकामुराशी बरोबरी साधून स्पर्धेच्या अर्ध्या टप्प्यावर आपली गुणसंख्या 4.5 वर नेत अर्ध्या गुणाची आघाडी परत मिळवली आहे. निजत आबासोव्हसोबतच्या बरोबरीनंतर विदित गुजराथीने आपली गुणसंख्या 3.5 वर नेली असून तो नाकामुरासोबत संयुक्तरीत्या पाचव्या स्थानावर आहे. अलीरेझाने स्वत: थोडेसे वर नेण्यात यश मिळविले असून 2.5 गुणांसह त्याने सातवे स्थान मिळविले आहे. दोन गुणांसह आबासोव्ह अजूनही शेवटच्या स्थानावर आहे.

Advertisement

महिला विभागात आर. वैशालीला या स्पर्धेतील तिसरा पराभव पत्करावा लागला, तर इतर तीन सामने अनिर्णित राहिले. चीनच्या टिंगजी लेईचे आव्हान वैशालीसाठी खूप जड गेले. चीनच्या झोंगी टॅनने आपली अर्ध्या गुणाची आघाडी कायम ठेवताना जवळची प्रतिस्पर्धी रशियाच्या अॅलेक्झांड्रा गोर्याचकिनासोबतचा सामना बरोबरीत सोडविला. रशियाच्या कातेरीना लागनोने बल्गेरियाच्या नुरग्युल सलीमोव्हासोबत बरोबरी साधली आणि अॅना मुझीचूक व भारताची कोनेरू हंपी यांच्यातील लढतही बरोबरीत संपली.

महिला विभागातील भारताचे आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे. कारण झोंगी पाच गुणांनिशी भक्कमपणे आघाडीवर आहे, तर गोर्याचकिनाच्या खात्यात 4.5 गुण आहेत. लाग्नो आणि लेई यांनी प्रत्येकी चार गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे आणि तीन गुणांसह सलीमोव्हा पाचव्या स्थानावर आहे. हंपी, वैशाली आणि मुझीचूक यांना स्पर्धेच्या उत्तरार्धात पुनरागमन करण्यासाठी एखाद्या चमत्काराची गरज आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. कारण या तिघांचे अवघे 2.5 गुण आहेत.

Advertisement
Tags :

.