For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुकेश ब्लूबॉमकडून पराभूत, एरिगेसीच्या वाट्याला बरोबरी

06:45 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुकेश ब्लूबॉमकडून पराभूत  एरिगेसीच्या वाट्याला बरोबरी
Advertisement

ब्लूबॉम/ वृत्तसंस्था 

Advertisement

टाटा स्टील मास्टर्समध्ये विश्वविजेता डी. गुकेशला आणखी एक धक्का सहन करावा लागला. नवव्या फेरीत जर्मनीच्या मॅथियास ब्लूबॉमकडून त्याला पराभव पत्करावा लागला, तर अर्जुन एरिगेसीला अमेरिकन हान्स मोके निमनने झटपट बरोबरीत रोखले.

विश्वचषक विजेत्या जावोखिर सिंदारोव्हने आघाडीवर असलेला सहकारी उझबेक बुद्धिबळपटू नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हसोबत बरोबरी साधली, जो सहा गुणांसह वर्चस्व राखून आहे. सिंदारोव्हला दुसऱ्या स्थानावर डचमन जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट 5.5 गुणांसह येऊन मिळाला आहे. स्पर्धेत चार फेऱ्या शिल्लक असताना ते निमनपेक्षा अर्ध्या गुणाने पुढे आहेत. गुकेश आणि एरिगेसी संघर्ष करत असून प्रत्येकी चार गुणांवर अडकले आहेत. विश्वविजेत्याने पांढऱ्या सोंगाट्यांसह खेळताना आणखी एक धक्कादायक निकाल सहन केला.

Advertisement

किंग्स पॉन गेम निवडताना गुकेशने बिशप्स ओपनिंगचा पर्याय वापरला. अलीकडच्या काळात प्रतिष्ठित स्तरावर ही पद्धत क्वचितच पाहायला मिळाली आहे. पण ब्लूबॉमने आत्मविश्वासाने प्रतिसाद दिला. गुकेशने त्याच्या 37 व्या चालीवर पराभव मान्य केला. दिवसाचा सर्वांत प्रभावी खेळ माजी विजेता जॉर्डन व्हॅन फॉरेस्टकडून झाला. अनिश गिरीनंतर त्याच्या देशाच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या या डचमनने वर्षातील त्याचा सर्वोत्तम फॉर्म दाखवला. त्याने जर्मनीच्या विन्सेंट कीमरला नमविले. हा खेळ फक्त 26 चाली चालला.

एरिगेसीने पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना त्याच्या आवडीनुसार गोष्टी गुंतागुंतीच्या करण्याचे  प्रयत्न केले. पण हे प्रयत्न स्पर्धेत पुन्हा एकदा फळले नाहीत. चांगल्या सुऊवातीनंतरही या अव्वल मानांकित खेळाडूला संघर्ष करावा लागत आहे आणि निमनसाठी आव्हान पेलणे कठीण गेले नाही. तो येथे काही खरोखरच उत्कृष्ट सामने खेळला आहे. एरिगेसीला लवकरच हे लक्षात आले की, काही तरी घडण्याची आशा बाळगणे धोकादायक ठरू शकते. दोन्ही खेळाडूंनी 22 चालींमध्ये बरोबरी मानून घेतली.

Advertisement
Tags :

.