For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आबासोव्हला नमवून गुकेश पुन्हा संयुक्तरीत्या आघाडीवर

06:50 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आबासोव्हला नमवून गुकेश पुन्हा संयुक्तरीत्या आघाडीवर
Advertisement

दोन फेऱ्या बाकी असताना आर. प्रज्ञानंद, विदित गुजराथी यांचे आव्हान संपुष्टात आल्यात जमा

Advertisement

वृत्तसंस्था/ टॉरंटो

भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याने अझरबैजानच्या निजत आबासोव्हच्या बचावाला मोडीत काढून विजय नोंदवत आणखी एक विलक्षण कामगिरी केली आणि पुन्हा एकदा संयुक्तरीत्या आघाडीवर जाण्यात यश मिळविले. परंतु आर. प्रज्ञानंद आणि विदित गुजराथी यांचे आव्हान कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या 12 व्या फेरीनंतर संपुष्टात आल्यात जमा आहे.

Advertisement

अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने फ्रान्सच्या फिरोजा अलीरेझावर विजय मिळविल्याने आता तीन बुद्धिबळपटू संयुक्तरीत्या आघाडीवर पोहोचले आहेत. गुकेश आणि नाकामुरा हे 7.5 गुण झालेल्या रशियाच्या इयान नेपोम्नियाचीसह अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे. नेपोम्नियाचीसमवेतचा प्रज्ञानंदचा सामना बरोबरीत संपला. वरील तिघांनंतर सात गुणांसह अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाचा क्रमांक लागतो.

प्रज्ञानंद सहा गुणांसह पाचव्या स्थानावर असून गुजराती पाच गुणांसह त्याच्या खालोखाल आहे. तथापि, आठ खेळाडूंच्या दुहेरी राऊंड-रॉबिन पद्धतीच्या या स्पर्धेत फक्त दोन फेऱ्या बाकी असताना त्यांना आघाडी मिळविणे जवळजवळ अशक्य आहे. अलीरेझा आणि आबासोव्ह हे अनुक्रमे 4.5 आणि तीन गुणांसह गुणतालिकेत तळाशी आहेत.

महिला विभागात चीनचे वर्चस्व झोंगयी टॅनने मजबूत केले असून तिने बल्गेरियाच्या नुरग्युल सलीमोव्हासोबत बरोबरी साधली. रशियन कॅटेरिना लागनो अन्य एक चिनी खेळाडू टिंगजी लेईविऊद्ध फक्त अर्धा गुण मिळवू शकली. भारताच्या कोनेरू हम्पीने रशियाच्या अॅलेक्झांड्रा गोर्याचकिना हिला बरोबरीत रोखताना चांगली कामगिरी केली, तर आर. वैशालीने युक्रेनच्या अॅना मुझीचूकला नमवत सलग दुसरा विजय मिळवला. टॅन आठ गुणांसह आघाडीवर असून लेई अर्ध्या गुणाने मागे आहे. हम्पी, लागनो आणि गोर्याचकिना हे त्रिकूट सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. वैशालीने 5.5 गुणांसह सलीमोव्हा आणि मुझिचूक यांना मागे टाकत सहावे स्थान मिळविले आहे.

Advertisement
Tags :

.