कार्लसन, वेस्लीसह गुकेश संयुक्तरीत्या अग्रस्थानी
वृत्तसंस्था/झाग्रेब (क्रोएशिया)
ग्रँड चेस टूरचा एक भाग असलेल्या सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या तीन फेऱ्यांच्या शेवटी जागतिक विजेता डी. गुकेशने सलग दोन विजय मिळवत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन, पोलंडचा डुडा जान-क्रिज्स्टॉफ आणि अमेरिकन वेस्ली सो यांच्यासोबत अव्वल स्थानावर बरोबरी साधली आहे. दुडाविऊद्धच्या पराभवाने दिवसाची सुऊवात केल्यानंतर गुकेशने फ्रान्सच्या अलिरेझा फिरोजावर मात केली आणि नंतर सहकारी आर. प्रज्ञानंदचा पराभव केला आणि संभाव्य सहापैकी चार गुण मिळवले.
कार्लसनने वेस्ली सोला हरवले आणि स्थानिक स्टार इव्हान सारिक आणि दुडाविऊद्धचे उर्वरित दोन्ही सामने बरोबरीत सोडवून गुकेशशी बरोबरी साधली. गुकेश वगळता निर्णायक सामन्यांमध्ये वेस्लीचा सहभाग राहिला. कारण त्याने त्याचा अमेरिकन सहकारी फॅबियानो काऊआना आणि हॉलंडचा अनिश गिरी यांना हरवले. फॉर्ममध्ये असलेल्या प्रज्ञानंदचा दिवस कठीण गेला. कारण त्याने फिरोजा आणि उझबेकिस्तानच्या नोदीरेक अब्दुसत्तोरोव्ह यांच्याशी बरोबरी साधली आणि गुकेशविऊद्धचा पराभव त्याला महागात पडला. रॅपिड गटात अजून सहा फेऱ्या बाकी आहेत आणि त्यानंतर ब्लिट्झमध्ये 18 फेऱ्या होणार आहेत.
स्पर्धेतील हे सुऊवातीचे दिवस असले, तरी फ्रीस्टाइल बुद्धिबळानंतरचा कार्लसनचा हा दुसरा आवडता प्रकार असून विजेतेपदाचा भक्कम दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. चार खेळाडू आघाडीवर असून गिरी आणि सारिक प्रत्येकी तीन गुणांसह त्यांच्या मागे आहेत आणि त्यानंतर चार खेळाडूंचा गट म्हणजे काऊआना, अब्दुसत्तोरोव्ह, फिरोजा आणि प्रज्ञनांद प्रत्येकी दोन गुणांसह विसावलेले आहेत. रॅपिड गटात विजयासाठी दोन गुण दिले जातात, तर ब्लिट्झमध्ये प्रत्येक विजयासाठी एक गुण असेल. पहिल्या फेरीतील पराभवानंतर गुकेश निराश झाला नाही आणि त्याने उत्तम प्रयत्न केले. डुडाला फक्त एक चांगली जागा मिळाली आणि तो चांगला खेळला, असे दिवसाच्या शेवटी गुकेश म्हणाला.