गुकेशची पुन्हा बरोबरी, अरविंदचा निमनला धक्का
वृत्तसंस्था/ प्राग
प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवाच्या मास्टर्स विभागाच्या दुसऱ्या फेरीत जागतिक विजेता डी. गुकेशने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक याकुबबोएव्हसोबत आणखी एक बरोबरी साधली, तर गतविजेता अरविंद चिदंबरमने अमेरिकेच्या हान्स मोके निमनला धक्का दिला.
निमनसोबतच्या बरोबरीनंतर गुकेशचा पांढऱ्या सोंगाट्या घेऊन दुसरा सामनाही फारसा यशस्वी झाला नाही. काही चालींनंतर परिस्थिती समतोल दिसू लागली. अरविंदने फिलिडोर डिफेन्ससाठी त्याची नवीन पसंती सुरू ठेवली, तर निमनने पांढऱ्या सोंगाट्यांसह चांगली सुरुवात केली होती. तथापि, एका महत्त्वाच्या टप्प्यावर अमेरिकन खेळाडूला वेळ कमी पडला आणि त्याची मोठी किंमत त्याला चुकवावी लागली.
अरविंदने त्याच्या संधींचा फायदा घेतला आणि लवकरच शेवटच्या टप्प्यात त्याचे विजयात रुपांतर करण्यात तो यशस्वी झाला. उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हकडून पहिल्या फेरीत पराभव झाल्यानंतर चेन्नईस्थित खेळाडूसाठी हा एक स्वागतार्ह विजय होता. दिवसाच्या इतर एकमेव निर्णायक सामन्यात स्पेनच्या डेव्हिड आंतोन गुइजारोने फॉर्ममध्ये असलेला डचमन जॉर्डन व्हॅन फॉरेस्टला हरवले.
सात फेऱ्या अजून बाकी असताना अब्दुसत्तोरोव्ह, याकुबबोएव्ह आणि स्थानिक खेळाडू डेव्हिड नवारा प्रत्येकी 1.5 गुणांसह आघाडीवर आहेत आणि गुकेश, अरविंद, व्हॅन फॉरेस्ट आणि गुइजारो अर्ध्या गुणाने मागे आहेत. 10 खेळाडूंच्या व 9 फेऱ्यांच्या स्पर्धेत इराणचा परहम मॅगसुदलू, अव्वल मानांकित जर्मनीचा विन्सेंट कीमर आणि निमन हे आणखी अर्ध्या गुणाने मागे आहेत.
चॅलेंजर्स विभागात ग्रँडमास्टर आणि महिलांच्या विश्वचषकातील विजेत्या दिव्या देशमुखने स्पेनच्या डॅनिल युफासोबत बरोबरी साधली आणि दोन सामन्यांनंतर पन्नास टक्के गुणांवर राहिली. पहिल्या सामन्यात हंगेरीच्या सर्वोच्च मानांकित बेंजामिन ग्लेडुरासोबत बरोबरी साधल्यानंतर जागतिक अजिंक्यपद सामन्यात खेळण्याची संधी मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या दिव्यासाठी हा आणखी एक चांगला निकाल होता. अन्य एक भारतीय सूर्यशेखर गांगुलीने डेन्मार्कच्या जोनास बुहल बजेरेसोबत बरोबरी साधून आपले खाते उघडले.