गुकेशची वॉर्मरडॅमवर मात, अग्रस्थान कायम
वृत्तसंस्था/विज्क अॅन झी
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या 10 व्या फेरीच्या अखेरीस जागतिक विजेता डी. गुकेशने डच ग्रँडमास्टर मॅक्स वॉर्मरडॅमला हरवून 7.5 गुणांसह एकट्याने आघाडी कायम ठेवली आहे. 2800 रेटिंगच्या जवळ पोहोचलेल्या गुकेशसाठी हा आणखी एक महत्त्वपूर्ण दिवस राहिला. बराच वेळ बरोबरी राहिल्यानंतर वॉर्मरडॅम चुकला आणि गुकेशने काळ्या सोंगाट्यांसह सहज विजय मिळविला. गुकेश आता उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हपेक्षा अर्ध्या गुणाने पुढे आहे. स्लोव्हेनियाच्या व्लादिमीर फेडोसेव्हवर सुरेख विजय मिळवल्यानंतर आर. प्रज्ञानंद 6.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अर्जुन एरिगेसीने जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरशी बरोबरी साधली आणि 10 व्या दिवशीही त्याचा विजयाचा शोध सुरूच राहिला. पी. हरिकृष्णने अमेरिकेच्या अव्वल मानांकित फॅबियानो काऊआनाविऊद्ध आपला किल्ला राखला, तर लिओन ल्यूक मेंडोन्साने अनीश गिरीसोबत बरोबरी साधली.
प्रज्ञानंदाने फेडोसेव्हविऊद्ध वर्चस्व गाजवले, ज्याने काळ्या सोंगाट्या घेऊन खेळताना ताराश डिफेन्सचा पर्याय निवडला. 48 चालींमध्ये हा सामना संपला. एरिगेसीला कीमरने सहज बरोबरीत रोखले. हरिकृष्णाला काळ्या सेंगाट्या घेऊन खेळणाऱ्या काऊआनाविऊद्ध काही प्रमाणात तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला. 68 चालींनंतर हा सामना बरोबरीत संपला. चॅलेंजर्स विभागात आर. वैशालीने स्पर्धेतील आघाडीची खेळाडू झेक प्रजासत्ताकच्या गुयेन थाई व्हॅन दाईविऊद्ध जोरदार लढत दिली, मात्र तिला अखेरीस सामना गमवावा लागला, तर दिव्या देशमुखने जर्मनीच्या फ्रेडरिक स्वानेविऊद्ध स्पर्धेतील आणखी एक गेम गमावला. पाच गुणांसह वैशालीने नववे स्थान मिळवले आहे आणि दोन गुणांसह दिव्या 14 खेळाडूंच्या राउंड-रॉबिन स्पर्धेत 13 व्या स्थानावर आहे. या स्पर्धेच्या फक्त तीन फेऱ्या शिल्लक आहेत.