गुकेशची वेई यीवर मात, कार्लसनसह जेतेपदाच्या शर्यतीत
वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंजर (नॉर्वे)
विद्यमान विश्वविजेता डी. गुकेशने आणखी एक अडथळा पार केला असून नवव्या आणि उपांत्य फेरीत चीनच्या वेई यीचा पराभव करून तीन पूर्ण गुण मिळवले आणि नॉर्वेजियन स्टार मॅग्नस कार्लसनसह प्रतिष्ठित नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदासाठीचा अव्वल दावेदार म्हणून तो उदयास आला.
एक फेरी बाकी असताना गुकेश 14.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर पाच वेळचा विश्वविजेता कार्लसन, ज्याने अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो काऊआनाला पराभूत करून पूर्ण गुण मिळवले, तो सहा खेळाडूंच्या या डबल राउंड-रॉबिन स्पर्धेत फक्त अर्ध्या गुणाने पुढे आहे. निर्णायक 10 व्या फेरीत गुकेशची लढत अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो काऊआनाशी होईल, तर कार्लसनची लढत अर्जुन एरिगेसीशी होईल. दोघांनाही विजेतेपद आणि 69,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळवून वरचढ ठरण्याची आशा आहे. जर गतविजेता कार्लसन जिंकला, तर 2016 पासून सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील त्याचे हे सातवे विजेतेपद असेल. गुकेशची ही सहभागी होण्याची दुसरी खेप असून तो येथे प्रथमच जेतेपद मिळविण्याची आशा बाळगून असेल.
13 गुण मिळविलेला दुसरा अमेरिकन ग्रँडमास्टर हिकारू नाकामुरा याला इतर निकाल त्याच्या बाजूने गेले, तर दुर्मिळ अशी संधी आहे. नाकामुराने क्लासिकल सामना दोघांकडे 40 मिनिटांपेक्षा अधिक वेळ असताना बरोबरी सोडविल्यानंतर अर्जुन एरिगेसीला धक्का देताना आर्मागेडन टायब्रेकमध्ये भारतीयाच्या आव्हानाला चिरडून टाकले. बुधवारच्या दुसऱ्या विश्रांतीच्या दिवसानंतर गुकेश अधिक ताजातवाना दिसला आणि त्याने 40 व्या चालीवर त्याच्या चिनी प्रतिस्पर्ध्याला नमते घेण्यास भाग पाडले. वेई यीने आपला उंट गमावला तेव्हा पांढऱ्या सेंगाट्या घेऊन खेळणाऱ्या गुकेशने संधीचा फायदा घेतला आणि निर्णायक आघाडी मिळवली.
गुकेशचे मागील दोन्ही विजय पहिल्या विश्रांतीच्या दिवसानंतर सलग दिवशी जागतिक अव्वल क्रमांक धारक कार्लसन आणि सहकारी एरिगेसीविरुद्ध नोंदले गेले होते. ‘मी आज खेळलेल्या खेळावर आनंदित आहे. शुक्रवारी आशा आहे की, मी आणखी एक चांगला सामना खेळू शकेन. त्यात निकाल काय लागेल ते आपण नंतर पाहूया, सध्या मी फक्त खेळावर लक्ष केंद्रीत करून आहे, असे गुकेशने नंतर सांगितले.
या 19 वर्षीय विश्वविजेत्याला अंतिम फेरीत काऊआनाविऊद्ध खेळताना कठीण आव्हान पेलावे लागेल. कारण कार्लसनने पुनरागमन करण्यापूर्वी हा अमेरिकन खेळाडू गुणतालिकेत आघाडीवर होता. दरम्यान, पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळणाऱ्या कार्लसनने 48 चालींमध्ये चुकीचा फायदा घेत काऊआनाला हरवले. खरे तर अमेरिकन खेळाडूने खेळाच्या बऱ्याचशा भागात गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे केल्या होत्या. कार्लसनला फॅबियानोने पुढाकार कसा घेतला नाही याचे आश्चर्य वाटले. ‘खरे सांगायचे तर, मला असे वाटले की, फॅबियानो आज चांगल्या स्थितीत नव्हता. त्याचे अनेक निर्णय मला समजले नाहीत. शून्य स्थितीतूनही मी अधिकाधिक फायदा मिळवत राहिलो’, असे कार्लसन म्हणाला. एरिगेसीविऊद्धच्या शेवटच्या सामन्यापूर्वी या विजयाने मनोबल वाढवले आहे, असेही त्याने सांगितले.
दुसरीकडे, महिला विभागात दोन वेळची जगज्जेती कोनेरू हम्पीने काळ्या सेंगाट्यासह खेळताना चीनच्या लेई टिंगजीकडून पराभव पत्करून जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याची एक उत्तम संधी वाया घालवली. हम्पी आता 13.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर 35 वर्षीय युक्रेनियन ग्रँडमास्टर अॅना मुझीचुकने चिनी विश्वविजेत्या जू वेनजुनला (12.5 गुण) हरवून भारतीय खेळाडूवर दोन गुणांची आघाडी घेतली आहे. हम्पी अंतिम फेरीत जूशी लढेल आणि तिचे लक्ष तीन गुणांवर असेल. त्याचवेळी मुझीचुक आर. वैशालीकडून पराभूत होईल, अशीही आशा तिला बाळगावी लागेल.