नॉर्वेत गुकेश-अर्जुनच्या कार्लसनशी लढती रंगण्याची अपेक्षा : आनंद
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि अर्जुन एरिगेसी यांना पुढील महिन्यात सुरू होण्राया नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनचा मुकाबला करताना कोणत्याही प्रकारची प्रेरणेची कमतरता भासणार नाही आणि कार्लसन देखील अशा प्रकारच्या लढतींसाठी उत्सुक असेल, असे मत महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने व्यक्त केले आहे.
या स्पर्धेत गुकेश, एरिगेईसी, आर. वैशाली आणि कोनेरू हम्पी असे एकूण चार भारतीय खेळाडू सहभागी होणार असून 26 मे ते 6 जूनदरम्यान स्टॅव्हेंजर शहरात ही स्पर्धा होईल. मला तिथे खूप रोमांचक लढतींची अपेक्षा आहे, असे आनंदने मुंबईच्या क्रीडा पत्रकार संघटनेने येथे आयोजित केलेल्या संवादाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
गुकेश आणि अर्जुन या दोघांनाही मॅग्नसच्या आव्हानाचा सामना करण्याच्या बाबतीत प्रेरणा किंवा दृढनिश्चयाची कमतरता भासणार नाही. उलट मॅग्नस आमच्या तऊण खेळाडूंपासून खूप प्रेरित झालेला आहे असे म्हणावे लागेल. तो आव्हानांनी खूप प्रेरित होतो. मी त्याला कोलकाता असो किंवा वर्ल्ड रॅपिड ब्लिट्झ असो, अनेक स्पर्धांमध्ये पाहिले आहे. अशा प्रकारच्या लढतींची तो उत्सुकतेने वाट पाहतो, असे आनंदने सांगितले. आनंद म्हणाला की, या स्पर्धेतील चार भारतीयांचा सहभाग हा देशातील बुद्धिबळाची वाढ दाखवून देतो.