शेवटच्या चेंडूवर गुजरातने जिंकला पहिला सामना
रोमांचक लढतीत दिल्ली कॅपिटल्सवर अवघ्या 1 धावेने मात : सामनावीर रशीद खानचे 3 बळी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या रोमहर्षक सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर केवळ एका धावेने रोमांचक विजय मिळवला. या हंगामातील दिल्लीचा हा पहिलाच पराभव ठरला आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी मिळाल्यावर गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावून 210 केल्या. प्रत्युत्तरात, दिल्लीचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 209 धावाच करू शकला. दिल्लीकडून केएल राहुलने 92 धावांची खेळी केली, तर डेव्हिड मिलरने 20 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या, पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाहीत.
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गुजरात टायटन्सला फलंदाजीसाठी पाचारण केले. गुजरातच्या टॉप-5 फलंदाजांनी मिळून 210 धावांचा डोंगर उभारला. साई सुदर्शन 12 धावा करत लवकर बाद झाला. यानंतर आलेल्या जोस बटलरने संघाचा डाव सावरत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. बटलर 27 चेंडूत 3 चौकार व 5 षटकारांसह 52 धावा करत बाद झाला. यानंतर कर्णधार शुभमन गिल व वॉशिंग्टन सुंदर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 60 चेंडूत 104 धावांची भागीदारी रचली. गिलने मोठ्या प्रतीक्षेनंतर टी-20 मध्ये अर्धशतक झळकावले. त्याने 45 चेंडूत 4 चौकार व 5 षटकारांसह 70 धावांचे योगदान दिले तर वॉशिंग्टनने पहिले आयपीएल अर्धशतक झळकावताना 32 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 55 धावांची खेळी केली. तर ग्लेन फिलिप्स 14 धावा करुन बाद झाला. या जोरावरच गुजरातला द्विशतकी मजल मारता आली.
केएल राहुल, मिलरची खेळी व्यर्थ
गुजरात टायटन्सनने विजयासाठी दिलेल्या 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात दमदार झाली. पथुम निसांका व केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी रचली. निसांका 24 चेंडूत 6 चौकार व एका षटकारासह 41 धावा करत बाद झाला. यानंतर नितीश राणा 5, समीर रिझवी गोल्डन डक तर कर्णधार अक्षर पटेल 2 धावांवर बाद झाले. केएल राहुलने 52 चेंडूत 92 धावा फटकावल्या. यामध्ये त्याने 11 चौकार आणि 4 षटकार मारले. पण, शतकाच्या उंबरठ्यावर असताना तो बाद झाला. दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी अखेरच्या दोन ओव्हरमध्ये 36 धावांची गरज होती. मोहम्मद सिराजच्या 19 व्या ओव्हरमध्ये दिल्लीने 23 धावा काढल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये दिल्लीला 13 धावा करायच्या होत्या पण त्यांना 11 धावा करता आल्या. अखेरच्या 2 चेंडूत 2 धावा हव्या होत्या. मात्र पाचव्या बॉलवर डेव्हिड मिलरने धाव घेतली नाही. यामुळे दिल्लीला विजयासाठी 1 बॉल आणि 2 धावा हव्या होत्या. अखेरच्या बॉलवर मिलरला फटका मारता आला नाही आणि कुलदीप यादव धावबाद झाला आणि गुजरातने अवघ्या एका धावेने विजय मिळवला.