गुजरात-चेन्नई जेतेपदासाठी रविवारी आमनेसामने
वृत्तसंस्था /अहमदाबाद
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारी येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या क्वॉलिफायर सामन्यात शुबमन गिलच्या वादळी शतक आणि मोहित शर्माच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर यजमान गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रविवारी येथे जेतेपदासाठी लढत होईल. विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 233 धावा झळकाविल्या. शुभमन गिलने या स्पर्धेतील हे आपले तिसरे शतक झळकविले. त्याने 7 चेंडूत 10 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने 129 धावा झोपडल्या. गिलची या स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई इंडियन्सने डावातील 15 षटकापर्यंत गुजरातने दिलेल्या आव्हानाला योग्य प्रत्युत्तर देत वाटचाल केली होती. पण मोहित शर्माच्या पहिल्याच षटकात तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादव तर पाचव्या चेंडूवर विष्णू विनोद बाद झाले. त्यामुळे सामन्याला कलाटणी मिळाली. तत्पुर्वी लिटलने पॅमेऊन ग्रीनचा त्रिफळा उडविला होता. मोहित शर्माने यानंतर आपल्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनला तर तिसऱ्या चेंडूवर पियुष चावलाला बाद केले. मोहित शर्माने आपल्या तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कुमार कार्तिकेयला बाद करून मुंबईचा डाव 18.2 षटकात 171 धावात गुंडाळला. सूर्यकुमार यादवने शर्माच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचित झाला. त्याने 38 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारासह 61 तसेच तिलक वर्माने केवळ 14 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारासह 43 धावा झोडपल्या. रशीद खानच्या फिरकीवर तो त्रिफळाचित झाला. ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली तर इतरांना ती गाठता आली नाही. मुंबईच्या डावात 7 षटकार आणि 17 चौकार नोंदवले गेले. मुंबईने पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात 72 धावा जमवताना तीन गडी गमविले होते. कर्णधार शर्मा केवळ 8 धावावर बाद झाला. गुजराततर्फे मोहित शर्मा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 10 धावात 5 गडी तर रशीद खानने 33 धावात 2 तसेच मोहमद शमीने 41 धावात 2 गडी बाद केले. गुजरात टायटन्सला पहिल्या क्वॉलिफायर सामन्यात चेन्नईकडून हार पत्करावी लागली होती. पण त्यानंतर त्यांनी दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये मुंबईला पराभूत करून अंतिम फेरी गाठली.
या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजी दिली पावसामुळे मैदान थोडे ओलसर असल्याने गुजरात टायटन्सने आपल्या डावाला सावध सुरुवात केली. साहा आणि गिल या सलामीच्या जोडीने 38 चेंडूत 54 धावांची भागिदारी केली. गुजरातने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 50 धावा जमविताना एकही गडी गमाविला नाही. गुजरातचे पहिले अर्धशतक 35 चेंडूत फलकावर लागले. साहा आणि गिल यांची अर्धशतकी भागिदारी 35 चेंडूत नोंदविली गेली. त्यामध्ये गिलचा वाटा 31 धावांचा होता. गिलने यानंतर तुफान फटकेबाजीला प्रारंभ केला. डावातील सातव्या षटकात चावलाने साहाला यष्टीरक्षक ईशान किसनकरवी यष्टीचीत केले. त्याने 16 चेंडूत 3 चौकारांसह 18 धावा जमविल्या.
मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या जीवदानांचा गिलने पुरेपूर फायदा उठविला. गिलने आपले अर्धशतक 32 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने झळकविले. गुजरातचे शतक 67 चेंडूत फलकावर लागले. गिल आणि सुदर्शन यांनी दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 29 चेंडूत नोंदविली. गिलने आपले शतक 49 चेंडूत 8 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने झळकविले. या स्पर्धेतील गिलचे हे तिसरे शतक आहे. गुजरातने 150 धावा 87 चेंडूत नोंदविल्या. तर गिलने सुदर्शन समवेत दुसऱ्या गड्यासाठीची शतकी भागिदारी 49 चेंडूत नोंदविली. गुजरातचे द्विशतक 108 चेंडूत फलकावर लागले. गिलने 60 चेंडूत 10 षटकार आणि 7 चौकारांसह 129 धावा झोडपल्या. या स्पर्धेतील गिलची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. आता त्याने या स्पर्धेत 16 सामन्यातून सर्वाधिक म्हणजे 851 धावा जमवित ऑरेज कॅपचा मानकरी ठरला आहे. गिलने या स्पर्धेत 3 शतके, 4 अर्धशतके, 78 चौकार आणि 33 षटकार आतापर्यंत नोंदविले आहेत.
संक्षिप्त धावफलक - गुजरात टायटन्स : 20 षटकात 3 बाद 233 (साहा 16 चेंडूत 3 चौकारांसह 18, शुबमन गिल 60 चेंडूत 10 षटकार, 7 चौकारांसह 129, साईसुदर्शन निवृत्त 31 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 43, हार्दिक पांड्या 13 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 28, रशिद खान 2 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 5, अवांतर 10, मधवाल 1-52, चावला 1-45).
मुंबई इंडियन्स 18.2 षटकात सर्व बाद 171 (सूर्यकुमार यादव 38 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारासह 61, तिलक वर्मा 14 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारासह 43, ग्रीन 20 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारासह 30, रोहित शर्मा 1 चौकारासह 8, अवांतर 7, मोहित शर्मा 5-10, मोहमद शमी 2-41, रशीद खान 2-33, लिटल 1-26).