For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरातची आज ‘आरसीबी’समोर कसोटी

06:05 AM Apr 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुजरातची आज ‘आरसीबी’समोर कसोटी
Advertisement

रॉयल चॅलेंजर्स फॉर्मात असल्याने गुजरात टायटन्सला आव्हान पेलण्यासाठी करावी लागेल उत्तम सांघिक कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था/अहमदाबाद

येथे आज गुऊवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात अत्यंत आवश्यक सातत्याच्या शोधात असलेल्या गुजरात टायटन्ससमोर जबरदस्त फॉर्मात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचे मोठे आव्हान असेल. स्पर्धेच्या मध्यावर आठ सामन्यांत चार विजय आणि तितक्याच पराभवांसह गुजरात टायटन्स गुणतालिकेत मधल्या स्थानावर अडकले आहेत. याउलट गतविजेता आरसीबी जबरदस्त फॉर्मात असून त्यांनी आठ सामन्यांत सहा विजय नोंदवले आहेत.

Advertisement

आरसीबीची नव्या चेंडूवर मारा करणारी जोडी भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी एकत्रितपणे कहर केला आहे. एकीकडे भुवनेश्वरने आपल्या स्विंगच्या कौशल्याने जुन्या काळाची आठवण करून दिली आहे, तर दुसरीकडे हेझलवूडने कसोटी सामन्यासारख्या गोलंदाजीने फलंदाजांच्या बॅटच्या बाहेरील कडेला लक्ष्य करून त्यांना त्रस्त केले आहे. त्यात भर म्हणून मधल्या षटकांमध्ये कृणाल पांड्याच्या विविधांगी माऱ्याला तोंड देण्याचे आव्हान गुजरातसमोर राहणार आहे.

साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांनी धावा काढण्याच्या बाबतीत बहुतांश वाटा उचललेला असल्यामुळे गुजरात टायटन्स संघाची फलंदाजी वरच्या फळीवर अधिक अवलंबून असल्याचे चित्र उभे झाले आहे. वॉशिंग्टन सुंदरने मधल्या फळीत स्वत:ला सिद्ध केले आहे, तर शाहऊख खान आणि राहुल तेवतियासारख्या फिनिशर्सनी अद्याप चमकदार कामगिरी केलेली नाही. अधिक धार आणण्यासाठी जेसन होल्डरला मधल्या फळीत स्थान देण्यात आले आहे.

दोन्ही संघ फक्त एका आठवड्यापूर्वी चिन्नास्वामीवर भेटले होते, ज्यात आरसीबीने सात चेंडू शिल्लक असताना 206 धावांचा सहज पाठलाग केला होता. गुजरातला घरच्या मैदानावरही वर्चस्व गाजवता आलेले नाही. त्यांनी मोटेरा येथे खेळलेल्या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. आरसीबी हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असला, तरी सुधारणेला नेहमीच वाव असतो. सहकारी इंग्लिश खेळाडू फिल सॉल्टच्या दुखापतीमुळे मागील दोन सामने खेळलेला जेकब बेथेल प्रभाव पाडू शकलेला नाही. तो गुऊवारी रात्री विराट कोहलीसोबत फलंदाजी करताना आपली छाप सोडण्यास उत्सुक असेल. बेथेलने मागील टी-20 विश्वचषक स्पर्धेत आपले विशेष कौशल्य दाखवले होते. आरसीबीने आपल्या मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पूर्णपणे धुव्वा उडवला होता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढेल.

संघ

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, शाहऊख खान, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशिद खान, मानव सुतार, प्रसिद्ध कृष्णा, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, इम्पॅक्ट प्लेयर : राहुल तेवतिया.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल,  जितेश शर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, मंगेश यादव, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा, इम्पॅक्ट प्लेयर : जेकब बेथेल.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.