गुजरातचा युपी वॉरियर्सवर शानदार विजय
सामनावीर जॉर्जिया वेरहॅमची अष्टपैलू खेळी : लिचफिल्डची आक्रमक खेळी वाया
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
येथील डी.वाय.पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात गुजरात जायंट्सने धावांचा पाठलाग करणाऱ्या यूपी वॉरियर्सचा 10 धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावण्राया गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करत कर्णधार अॅश्ले गार्डनरच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर 4 बाद 207 धावांचा डोंगर उभा केला. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सला 8 बाद 197 धावाच करता आल्या. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या गुजरातच्या जॉर्जिया वेरहॅमला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रारंभी, यूपी वॉरियर्सची कर्णधार मेग लॅनिंगने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत गुजरात जायंट्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. गुजरातने 20 षटकात 4 बाद 207 धावा केल्या. कर्णधार अॅश्लने गार्डनरने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 41 चेंडूत 65 धावांचे योगदान दिले. याशिवाय, अनुष्का शर्माने 44, सोफी डिव्हाईनने 38 धावा फटकावल्या. शेवटच्या टप्प्यात जॉर्जियाने 10 चेंडूत नाबाद 27 धावा करत संघाला दोनशेचा टप्पा पार करुन दिला. यूपी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टोनने 2 विकेट्स घेतल्या.
युपी संघाचा 10 धावांनी पराभव
208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या यूपी वॉरियर्सच्या डावाची सुरवात चांगली झाली नाही. सलामीवीर किरण नवगिरे 1 धाव करून बाद झाली. त्यानंतर मात्र, सलामीवीर मेग लॅनिंग आणि वन डाउन आलेल्या फोबी लिचफिल्डने सारी सूत्रे आपल्या हातात घेतली. या दोघींनी 70 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर नवगिरे 30 धावा करून माघारी परतली. त्यानंतर आलेली हरलीन देओलला भोपळाही फोडता आला नाही. ठराविक अंतराने युपी संघाच्या विकेट जात राहिल्याने त्यांना 8 बाद 197 धावापर्यंत मजल मारता आली. दुसरीकडे, लिचफिल्डने एकाकी झुंज देताना सर्वाधिक 40 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारासह 78 धावा केल्या. त्यानंतर, डिआन्ड्रा डॉटिन 12, सोफी एक्लेस्टोन 11 धावा करून बाद झाल्या, तर आशा शोभना नाबाद 27 धावा तर पांडे 1 धाव करून नाबाद राहिल्या. परिणामी, गुजरात जायंट्सने 10 धावांनी विजय मिळवला. गुजरात जायंट्सकडून रेणुका सिंह ठाकूर, सोफी डिव्हाईन आणि जॉर्जिया वेरहॅम यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
गुजरात जायंट्स 20 षटकांत 4 बाद 207 (बेथ मुनी 13, सोफी डिव्हाईन 38, अनुष्का शर्मा 44, अॅश्ले गार्डनर नाबाद 65, वेरहॅम नाबाद 27, सोफी एक्लेस्टोन 2 बळी)
युपी वॉरियर्स 20 षटकांत 8 बाद 197 (मेग लॅनिंग 30, फोबी लिचफिल्ड 78, श्वेता सेहरावत 25, आशा शोभना नाबाद 27, रेणुका, सोफी आणि जॉर्जिय प्रत्येकी 2 बळी).