गुजरातचा दिल्ली कॅपिटल्सवर रोमांचक विजय
सामनावीर डिव्हाईनचा भेदक मारा, गायकवाडचे 3 बळी, बेथ मुनीचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ बडोदा
मध्यमगती गोलंदाज सोफी डिव्हाईन व अनुभवी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड यांच्या भेदक माऱ्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा विजयाचा घास खेचून आणत गुजरात जायंट्सने महिला प्रिमियर लीगमधील सामन्यात केवळ 3 धावांनी रोमांचक विजय मिळविला. 37 धावांत 4 बळी टिपणाऱ्या सोफी डिव्हाईनला सामनावीराचा बहुमान मिळाला.
राजेश्वरी गायकवाडने 20 धावांत 3 बळी घेत सोफीला उत्तम साथ दिली. गुजरातच्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना या दोघींच्या गोलंदाजीमुळे दिल्लीला 20 षटकांत 9 बाद 171 धावांपर्यंतच मजल मारता आली. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या 6 चेंडूत 9 धावांची गरज असताना डिव्हाईनने दोन बळी मिळविताना स्नेह राणा व निकी प्रसाद यांना बाद केले. यामुळे दिल्लीच्या आशा संपुष्टात आल्या.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर बेथ मुनीने 46 चेंडूत 58 तर अनुष्का शर्माने 25 चेंडूत 39 धावा फटकावल्यानंतर गुजरात जायंट्सने 20 षटकांत 9 बाद 174 धावा जमविल्या. दिल्लीच्या श्रीचरणीने 31 धावांत 4 बळी मिळविले. दिल्लीने या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या दोन षटकांतच 16 धावा फटकावल्या. शेफालीने 10 चेंडूत 14 धावा केल्या. गायकवाडने तिची खेळी संपुष्टात आणली. दिल्लीला लिझेली ली केवळ 11 धावा काढून बाद झाल्याने आणखी एक धक्का बसला. डिव्हाईन व तनुजा कंवर यांनी अचूक मारा केल्याने दिल्लीच्या फलंदाजांना धावा जमविणे कठीण गेले. कर्णधार जेमिमा व लॉरा वुलव्हार्ट यांनाही धावांसाठी संघर्ष करावा लागला. कोंडी फोडण्याच्या प्रयत्नात जेमिमाने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण ती त्रिफळाचीत झाली. पुढच्याच षटकात गार्डनरने कॅपचा बचाव भेदत त्रिफळा उडविला. स्नेह राणाने नंतर 15 चेंडूत 29 धावा फटकावताना 17 व्या षटकात 23 धावा वसूल केल्या.
12 चेंडूत 29 धावांची गरज असताना राणाने गार्डनरला एक षटकार, 2 चौकार ठोकले तर निकी प्रसादनेही याच षटकात आणखी एक चौकार मारल्यानंतर 6 चेंडूत 9 धावा असे समीकरण झाले. दिल्लीला विजयाची चांगली संधी होती. पण डिव्हाईनने शेवटच्या षटकात राणाला बाद केले. 2 चेंडूत 5 धावांची गरज होती. पण डिव्हाईनने त्यांना रोखत गुजरातला 3 धावांनी विजय मिळवून दिला. राणा व प्रसाद यांनी 31 चेंडूत 60 धावा फटकावत दिल्लीला विजयासमीप आणले होते. निकी प्रसादने 24 चेंडूत 47 धावा फटकावल्या.
संक्षिप्त धावफलक : गुजरात जायंट्स 20 षटकांत 9 बाद 174 : अनुष्का शर्मा 39, तनुजा कंवर 21, सोफी डिव्हाईन 13, अवांतर 18. श्री चरणी 4-31, चिनेली हेन्री 2-38, मिन्नू मणी 1-23. दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 8 बाद 171 : निकी प्रसाद 24 चेंडूत 47, स्नेह राणा 15 चेंडूत 29, वुलव्हार्ट 24, जेमिमा 16, अवांतर 20. सोफी डिव्हाईन 4-37, राजेश्वरी गायकवाड 3-20.