Eknath Shinde यांनी अवलंबलेल्या ‘गुजरात पॅटर्न’चे टायमिंग चुकले?, नेमके काय घडले
CM फडणवीस व शिंदे यांच्यात आता पूर्वीसारखा संवाद राहिलेला नाही?
By : प्रशांत चव्हाण
पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थंड डोक्याने राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. किंबहुना, चमकोगिरी वा श्रेयाच्या लढाईत हेच शिंदे अनेकदा आक्रमक झालेले पहायला मिळतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यातील वाढती जवळीक हा मागच्या काही दिवसात चर्चेचा विषय राहिला आहे.
याच शहा यांना खूष करण्यासाठी शिंदे यांनी ‘जय गुजरात’चा दिलेला नारा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हिंदी सक्ती व मराठीचा मुद्दा ऐरणीवर असताना शिंदेंनी अवलंबलेल्या या ‘गुजरात पॅटर्न’चे टायमिंग चुकले, असेच म्हणता येईल.
शिवसेनेत अभूतपूर्व फूट घडवून शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावले. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. तेव्हापासून शिंदे हे राज्याच्या राजकारणात खऱ्या अर्थाने चर्चेत आले. 40 आमदार फोडण्याबरोबरच शिवसेना हे पक्षनाव, चिन्हही शिंदे यांनी ठाकरे यांच्याकडून खेचून घेतले.
या कामी त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत झाली, ती महाशक्तीची. दुसऱ्या टर्ममध्ये शिंदे यांना संधी मिळाली नसली, तरी या ना त्या माध्यमातून आपले महत्त्व दाखवून देण्याची संधी ते सोडताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्यात आता पूर्वीसारखा संवाद राहिलेला नाही.
भाजपाच्या इतर नेत्यांशीही शिंदे वा त्यांचा पक्ष फटकून असतो. तथापि, अमित शहा यांना धरून राहण्यात हेच शिंदे थोडीशीही कसर बाकी ठेवत नाहीत. याद्वारे अप्रत्यक्षपणे देवाभाऊंवर दबाव टाकण्याची रणनीती ते खेळत असतात. पुण्यातील परवाच्या कार्यक्रमातही हेच झाले. एरवी शिंदेंचे बोलणे काहीसे विस्कळीत.
तथापि, शहा यांना पाहिल्यानंतर त्यांच्या रसवंतीला जी बहार आली, त्याला तोड नसावी. अमितभाई हे महाराष्ट्राचे जावई आहेत. ते देशाचे गृहमंत्री आहेत. तर त्यांच्या होम मिनिस्टर या महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या आहेत. त्यांच्या घरात गुजराती आणि मराठी आनंदाने नांदतात, असे सांगत शिंदे यांनी शहा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
त्यानंतर अति उत्साहात ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी नारेबाजी करूनही ते मोकळे झाले. वरकरणी यात काही गैरही नसावे. पण, भाषा सक्तीच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली. फडणवीस यांनी त्यांची पाठराखण केली असली, तरी शिंदे ट्रोल व्हायचे ते झालेच.
गुजरातमधून अमित शहा यांचा फॉर्म भरताना उद्धव ठाकरे यांनी असाच नारा दिल्याचा दावा आता शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. मात्र, गुजरातमधील तेव्हाचा प्रसंग आणि आता मराठीच्या मुद्द्यावर निर्माण झालेला तणाव पाहता ही तुलना अप्रस्तुतच म्हणावी लागेल.
हिंदीकरण हा भाजपाच्या राजकारणाचा अजेंडा असल्याची बाब लपून राहिलेली नाही. त्यातूनच पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय पुढे आला. शिवसेना शिंदे गटाकडे शिक्षणमंत्रिपद असताना हिंदी लादली जाणे, हेच मुळात पक्षाच्या मूळ फिलासॉफीवर आघात पोहोचवणारे.
हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्याच काळात झाल्याचा प्रतिवाद शिंदे गटाने केला. पण, याबाबतचा जीआर ठाकरे सरकारच्या काळात झाला नाही, आता झाला, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर शिंदे गटाची पीछेहाट झाल्याचे दिसून आले. त्यात शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी ही मातृभाषा झाल्यासारखी आहे, असे विधान केले.
या सगळ्यावर मूग गिळून गप्प असलेल्या दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांनी शहा यांच्यासमोर ‘जय गुजरात’चा नारा देऊन एकप्रकारे हे वर्तुळच पूर्ण केले. मुंबई महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आहे. मुंबईत गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीयांची संख्या निर्णायक आहे. त्यामुळे मराठी पलीकडे जाऊन मतांची बेगमी करण्याकडे शिंदे गटाचा कल दिसतो. देवरा व तत्सम नेत्यांना बळ देणे वा ‘गुजरात पॅटर्न’ अवलंबणे, हा त्याचाच भाग आहे.