गुजरातमधील क्षमा बिंदू स्वतःशीच विवाहबद्ध
बहुचर्चित विवाहसोहळा संपन्न : हनिमूनसाठी गोव्याला पसंती : एकटीनेच मारले सात फेरे, मोबाईलवर मंत्रोच्चार : देशातील पहिला आगळा-वेगळा विवाह
वडोदरा / वृत्तसंस्था
गुजरातमधील वडोदरा येथील 24 वषीय क्षमा बिंदू या युवतीने बुधवारी स्वतःशी लग्नगाठ बांधली. विवाह सोहळय़ादरम्यान हळदी, मेहंदीचे विधी झाले. तसेच एकटीनेच सात फेरे घेतल्यानंतर आरशासमोर उभे राहून भांगही भरली अन् स्वतः मंगळसूत्रही घातले. या सोहळय़ाला पंडित न आल्याने मोबाईलवर मंत्रोच्चार करण्यात आले. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह असल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नानंतर क्षमाने हनिमूनसाठी गोव्याची निवड केली असून ती दोन आठवडे तेथे राहणार आहे.
गुजरातमधील क्षमा बिंदू या मुलीने स्वतःला दिलेले वचन पूर्ण केले आणि एका खास विवाह सोहळय़ात स्वतःसोबत लग्नगाठ बांधली. वडोदरातील गोत्री भागात राहणाऱया क्षमाच्या लग्नाला वर (नवरा) किंवा पंडित नव्हते. परंतु, क्षमाच्या काही खास निकटवर्तीयांसह काही नातेवाईकांनी या लग्नाला आवर्जून उपस्थिती दर्शवली होती. बिंदू ही वडोदरा येथील एका पुण्यातील कंपनीच्या आऊटसोर्सिंग कार्यालयात काम करते. तिने एमएस युनिव्हर्सिटी-वडोदरा येथून समाजशास्त्र हा विषय घेऊन बीए पदवी संपादन केली आहे. क्षमा ही मूळची केंद्रशासित प्रदेश दमण येथील आहे, पण ती सध्या वडोदरामधील सुभानपुरा भागात राहते. ती नावासोबत आडनावाऐवजी ‘बिंदू’ हा शब्द वापरते.
नवरी बनण्याची ‘हौस’ केली पूर्ण
मला कधीच लग्न करायचे नव्हते. मात्र मला नवरी बनायची हौस पुरी करायची असल्यामुळे मी स्वतःशीच लग्न करायचा निर्णय घेतला, अशी माहिती क्षमाने दिली. क्षमाने 11 जून रोजी स्वतःसोबत लग्न करण्याची घोषणा केली होती. परंतु, तिच्या या निर्णयानंतर तिच्यावर टीका झाली होती. त्यामुळे तिने जाहीर केलेल्या तारखेच्या तीन दिवस आधीच म्हणजे 8 जून रोजी स्वतःसोबत लग्न केले.
गेल्या काही दिवसात त्यांच्या घरी सतत लोकांची वर्दळ सुरू होती. याबाबत त्यांच्या शेजाऱयांनी विरोध केला होता. त्यामुळे क्षमाने ठरलेल्या तारखेपूर्वी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोणीतरी 11 जून रोजी आपल्या घरी येऊन वाद निर्माण करेल याची भीती तिला वाटत होती. क्षमाने प्रथम मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, भाजपच्या काही नेत्यांनी तिच्या या निर्णयाला विरोध केल्यानंतर तिने आपला निर्णय बदलून घरीच लग्न केले. याबरोबरच पंडितने देखील या लग्नात लग्न विधी करण्यास नकार दिला. त्यामुळे क्षमाने रेकॉर्डिंगवर मंत्रपठण करून हा विवाह करण्याचा निर्णय घेतला.