गुजरात जायंट्स 81 धावांनी विजय
युपी वॉरियर्स पराभूत, मुनीचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था / लखनौ
महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेतील येथे सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेथ मुनीचे नाबाद अर्धशतक (96) तसेच गौतम आणि कवंर यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर गुजरात जायंट्सने युपी वॉरियर्सचा 81 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे गुजरात जायंट्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असून दिल्ली कॅपिटल्स 10 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
या सामन्यात युपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सला प्रथम फलंदाजी दिली. गुजरातने 20 षटकात 5 बाद 186 धावा जमविल्या. त्यानंतर युपी वॉरियर्सचा डाव 17.1 षटकात 105 धावांत आटोपला.
गुजरातच्या डावामध्ये सलामीच्या बेथ मुनीने 59 चेंडूत 17 चौकारांसह नाबाद 96 तर हर्लिन देवोलने 32 चेंडूत 6 चौकारांसह 45 धावा जमविल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 101 धावांची शतकी भागिदारी केली. कर्णधार गार्डनरने 1 चौकारांसह 11, डॉटीनने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17, लिचफिल्डने 1 चौकारांसह 8 धावा जमविल्या. गुजरातच्या डावात 1 षटकार 27 चौकार नोंदविले गेले. पहिल्या 6 षटकात गुजरातने 40 धावा जमविताना 1 गडी गमविला. मुनीने 37 चेंडूत 9 चौकारांसह अर्धशतक झळकविले. गुजरातचे अर्धशतक 41 चेंडूत, शतक 71 चेंडूत, दीड शतक 101 चेंडूत फलकावर लागले. युपी वॉरियर्सतर्फे इक्लेस्टोनने 2 तर हेन्री, दिप्ती शर्मा आणि गौड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना युपी वॉरियर्सच्या डावामध्ये हेन्रीने 14 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 28, इक्लेस्टोनने 20 चेंडूत 1 षटकारासह 14, छेत्रीने 22 चेंडूत 1 चौकारांसह 17 आणि सलामीच्या हॅरिसने 30 चेंडूत 3 चौकारांसह 25 धावा जमविलया. युपी वॉरियर्सच्या डावामध्ये 3 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. गुजराततर्फे के. गौतम आणि कवंर यांनी प्रत्येकी 3, डॉटीनने 2 तसेच मेघनासिंग व गार्डनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पहिल्या 6 षटकात युपी वॉरियर्सने 29 धावा जमविताना 4 गडी गमविले. त्यांचा निम्मा संघ 9 षटकाअखेर 39 धावांत बाद झाला होता. युपी वॉरियर्सचे अर्धशतक 62 चेंडूत तर शतक 95 चेंडूत फलकावर लागले.
संक्षिप्त धावफलक : गुजरात जायंट्स 20 षटकात 5 बाद 186 (बेथ मुनी नाबाद 96, देवोल 45, गार्डनर 11, डॉटीन 17, अवांतर 5, इक्लेस्टोन 2-34, हेन्री, शर्मा, गौड प्रत्येकी 1 बळी), युपी वॉरियर्स 17.1 षटकात सर्वबाद 105 (इक्लेस्टोन 14, हेन्री 28, छेत्री 17, हॅरीस 25, अवांतर 9, के. गौतम, कवंर प्रत्येकी 3 बळी, डॉटीन2-14, मेघना सिंग व गार्डनर प्रत्येकी 1 बळी)