गुजरात जायंट्सचा विजय
लखनौ : महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील येथे शुक्रवारी झालेल्या सामन्यात हर्लिन देवोलच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 3 चेंडू बाकी ठेवून पाच गड्यांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे गुजरात जायंट्सने गुणतक्त्यात 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दिल्लीचा संघ 10 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या मेग लेनिंगचे अर्धशतक मात्र वाया गेले. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार लेनिंग आणि शेफाली वर्मा यांनी डावाला दमदार सुरूवात करुन देताना 9 षटकात 83 धावांची भागिदारी केली.
वर्माने 27 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 40 धावा जमविल्या. सदरलॅंडने 2 चौकारांसह 14, रॉड्रिग्जने 4, जोनासेनने 1 चौकारांसह 9, कॅपने 1 चौकारासह नाबाद 7 तर ब्रिसेने 1 षटकारासह नाबाद 6 धावा केल्या. लेनिंगने 57 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह 92 धावा झळकविल्या. ती शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूर त्रिफळाचित झाली. दिल्लीच्या डावात 5 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. लेनिंगने 35 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह अर्धशतक झळकविले. पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात त्यांनी 51 धावा जमविल्या. गुजरात जायंट्सतर्फे मेघना सिंगने 3 तर डॉटिनने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजरातची सलामीची फलंदाज हेमलता दुसऱ्याच षटकात झेलबाद झाली.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 5 बाद 177 (लेनिंग 92, शेफाली वर्मा 40, मेघना सिंग 3-35, डॉटीन 2-37), गुजरात जायंट्स 19.3 षटकात 5 बाद 178 (हर्लिन देवोल नाबाद 70, मुनी 4, गार्डनर 22, डॉटीन 24, शिखा पांडे आणि जोनासेन प्रत्येकी 2 बळी, मणी 1-15)