For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरात जायंट्सचा एलिमिनेटर फेरीत प्रवेश

06:58 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुजरात जायंट्सचा एलिमिनेटर फेरीत प्रवेश
Advertisement

मुंबई इंडियन्सवर पहिला विजय, सामनावीर वेअरहॅमची अष्टपैलू चमक, हरमनप्रीतची एकाकी लढत

Advertisement

वृत्तसंस्था/ बडोदा

कर्णधार अॅश्ले गार्डनर व सामनावीरची मानकरी ठरलेली जॉर्जिया वेअरहॅम यांनी केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे गुजरात जायंट्सने डब्ल्यूपीएलमधील महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर केवळ 11 धावांनी विजय मिळवित सलग दुसऱ्यांदा एलिमिनेटर फेरीत स्थान मिळविले. हा विजय मिळविताना गुजरातने मुंबईविरुद्ध आठ सामन्यांची पराभवाची मालिकाही खंडित केली. नऊ सामन्यातील त्यांचा हा मुंबईवरील पहिलाच विजय आहे.

Advertisement

या मोसमात आतापर्यंत झालेल्या 41 सामन्यांत गुजरातने पाचही सामन्यांत प्रथम फलंदाजी करून विजय मिळविले. असा पराक्रम करणारा तो पहिला संघ बनला आहे. प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर गार्डनरने प्रतिआक्रमण करीत 28 चेंडूत 46 आणि वेअरहॅमने केवळ 26 चेंडूतच नाबाद 44 धावा फटकावल्याने गुजरातला 20 षटकांत 4 बाद 167 धावांची मजबूत मजल मारता आली. मधली फळी झटपट कोसळल्यानंतर या दोघींनी 71 धावांची भागीदारी केली. 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला या खेळपट्टीवर संघर्ष करावा लागला. कर्णधार हरमनप्रीतने एकाकी लढत देत 48 चेंडूत नाबाद 82 फटकावल्या, पण तिला दुसऱ्या बाजूने चांगली साथ न मिळाल्याने मुंबईला 20 षटकांत 7 बाद 156 धावांपर्यंतच मजल मारता आली.

24 चेंडूत 58 धावांची गरज असताना हरमनप्रीतने एकटीने झुंज देताना 3 चौकार, 3 षटकार ठोकत मुंबईला विजयासमीप आणले होते. यातील दोन षटकार तिने गार्डनरच्या शेवटच्या षटकात मारल्याने 3 चेंडूत 14 अशा स्थितीवर मुंबईला आणले. पण गार्डनरने संयम राखत अचूक मारा करून गुजरातला विजय मिळवून दिला. सलग आठ पराभवानंतर मुंबईवर मिळविलेला गुजरातचा हा पहिला विजय असून मंगळवारी होणाऱ्या एलिमिनेटर फेरीत त्यांनी स्थान मिळविले आहे.

आरसीबीने 8 पैकी सहा सामने जिंकत याआधीच थेट अंतिम फेरी गाठली असून मुंबईला एलिमिनेटर फेरी गाठण्यासाठी रविवारी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स व यूपी वॉरियर्स या लढतीच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल. या शेवटच्या साखळी सामन्यात यूपी वॉरियर्सने दिल्लीवर विजय मिळविल्यास मुंबईला सरस धावगतीच्या आधारे आगेकूच करता येईल आणि जर दिल्लीने विजय मिळविल्यास मुंबई स्पर्धेबाहेर पडेल. मुंबई व दिल्लीचे प्रत्येकी 6 तर यूपीचे 4 गुण झाले आहेत. या तिघांमध्ये मुंबईची धावगती सर्वात सरस आहे.

संक्षिप्त धावफलक : गुजरात जायंट्स महिला संघ 20 षटकांत 4 बाद 167 : सोफी डिव्हाईन 21 चेंडूत 25, अनुष्का शर्मा 31 चेंडूत 33, गार्डनर 28 चेंडूत 46, जॉर्जिया वेअरहॅम 26 चेंडूत नाबाद 44, अमेलिया केर 2-26, नॅट सायव्हर ब्रंट 1-36, शबनिम इस्माईल 1-29.

मुंबई इंडियन्स महिला संघ 20 षटकांत 7 बाद 156 : सजीवन सजना 25 चेंडूत 26, हरमनप्रीत कौर 48 चेंडूत 8 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 82, अमेलिया केर 16 चेंडूत 20, अमनजोत कौर 13, सोफी डिव्हाईन 2-23, जॉर्जिया वेअरहॅम 2-26, काश्वी गौतम 1-12, राजेश्वरी गायकवाड 1-46, गार्डनर 1-26.

Advertisement
Tags :

.