गुजरात : केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट, तीन ठार
24 जण जखमी; स्फोटात जवळच्या कंपन्यांचेही नुकसान
वृत्तसंस्था/ भरूच
गुजरातमधील भरूच जिह्यातील जीआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत मंगळवार रात्री उशिरा झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच अन्य 24 कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना भरूचमधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी चार ते पाच कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे.
भरूचमधील सायखा गावाजवळील विशाल फार्मा या जीआयडीसी कंपनीत पहाटे अडीच वाजता बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर आग लागली. हा स्फोट शक्तिशाली असल्यामुळे जवळच्या चार कंपन्यांचेही नुकसान झाले. तर तीन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. कंपनीतील स्फोटाची घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची सहा पथके घटनास्थळी दाखल झाली होती. अग्निशमन दल व पोलिसांकडून संयुक्तपणे घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य राबविण्यात आले.
सायखा गावाचे सरपंच जयवीर सिंह यांनी अपघाताबाबत प्रशासन आणि कंपनी मालकांवर गंभीर आरोप केले आहेत. सदर कंपनी कोणत्याही परवानगीशिवाय कार्यरत असतानाही प्रशासन लक्ष देत नसल्याचे जयवीर सिंह यांनी म्हटले आहे.