रोमांचक सामन्यात गुजरातचा मुंबईवर विजय
पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात मुंबईचा शेवटच्या चेंडूवर पराभव : गुजरातची गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप
वृत्तसंस्था/ मुंबई
पावसाचा व्यत्यय आलेल्या रोमांचक सामन्यात गुजरातने मुंबईवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 155 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची एकवेळ कठीण स्थिती होती. पण, पावसाने त्यांना साथ दिली व अखेरच्या षटकात विजयासाठी 6 चेंडूत 15 धावांची गरज असताना त्यांनी हा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला.
प्रारंभी, गुजरातने नाणेफेक जिंकत मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलग सहा सामने जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सिराजने रिकेल्टनला बाद केले. बहरात असणारा रोहित शर्माही (7) चौथ्या षटकात माघारी परतला. यानंतर विल जॅक्स व सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरताना 71 धावांची भागीदारी साकारली. विल जॅक्सने 35 चेंडूत 5 चौकार व 3 षटकरासह सर्वाधिक 53 धावा केल्या. तसेच सूर्याने 24 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर इतर मुंबईकर फलंदाजांनी सपशेल निराशा केली.
तिलक वर्मा (7), कर्णधार हार्दिक पंड्या (1), नमन धीर (7) हे स्टार फलंदाज स्वस्तात बाद झाले. यानंतर अखेरच्या काही षटकात कॉर्बिन बॉशने 22 चेंडूत 27 धावा करत मुंबईला दीडशेचा टप्पा गाठून दिला. दीपक चहर 8 धावांवर नाबाद राहिला. यामुळे मुंबईला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 155 धावा करता आल्या.
शेवटच्या षटकात गुजरातचा शानदार विजय
मुंबईने विजयासाठी दिलेल्या 156 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्याच षटकात साई सुर्दशनला (5) बोल्टने बाद केले. यानंतर कर्णधार शुभमन गिल व जोस बटलर या जोडीने संघाला सावरले. या दोघांनी 72 धावांची भागीदारी साकारली. बटलरने 27 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. त्याला अश्वनी कुमारने माघारी पाठवले. रुदरफोर्डने आक्रमक खेळताना 15 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारासह 28 धावा केल्या. पण तो ही फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला. कर्णधार गिलने 43 धावा केल्या पण बुमराहने त्याला बाद केले. यानंतर सामन्यात दोनवेळा पावसाचा व्यत्यय आल्याने सामना काही काळ थांबवण्यात आला. यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार गुजरातला 19 षटकांत 147 धावांचे टार्गेट मिळाले. यावेळी गुजरातला विजयासाठी 6 चेंडूत 15 धावांची आवश्यकता होती. गुजरातने हे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण करत गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. पराभवामुळे मुंबईचा संघ आता चौथ्या स्थानावर आहे. बुमराह , अश्वनी कुमार व बोल्ट यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स 20 षटकांत 8 बाद 155 (रिकेल्टन 2, रोहित शर्मा 7, सूर्यकुमार यादव 35, विल जॅक्स 53, बॉश 27, साई किशोर 2 बळी, सिराज, अर्शद खान, प्रसिध कृष्णा, रशीद खान, कोएत्झी प्रत्येकी एक बळी)
गुजरात टायटन्स 19 षटकांत 7 बाद 147 (साई सुदर्शन 5, शुभमन गिल 43, जोस बटलर 30, रुदरफोर्ड 28, बोल्ट, बुमराह व अश्वनी कुमार प्रत्येकी दोन बळी).