For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘जैश’चे आठ दहशतवादी गजाआड गुजरात, मध्य प्रदेशमध्ये एटीएसची कारवाई :

10:38 PM Jul 03, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
‘जैश’चे आठ दहशतवादी गजाआड गुजरात  मध्य प्रदेशमध्ये एटीएसची कारवाई
Advertisement

► वृत्तसंस्था
नवी दिल्ली
गुजरात एटीएसने गुजरात आणि मध्य प्रदेशातून जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या आठ दहशतवाद्यांना अटक केली आहे. ते दहशतवादी कारवाया करण्यासाठी गुजरातमध्ये जैश-ए-मोहम्मदचे सक्रिय जाळे स्थापन करण्याचे काम करत होते. एटीएसने चौकशी सुरू केली असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईच्या माध्यमातून एटीएसने दहशतवादी जाळे विस्तारण्याचे प्रयत्न उधळून लावले आहेत.

Advertisement

बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आठ आरोपींना गुजरात आणि मध्य प्रदेशातील विविध जिह्यांतून अटक करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी देण्यात आली. अहमद गाझीवाला, इब्राहिम घाघा, मुद्दसिर गाझीवाला, झकारिया दुर्रानी, मुफ्ती फैजान, मोहम्मद अमीन शेरा, मोहम्मद अब्दुल, बिलाल मोहम्मद अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गुजरात एटीएसनुसार, सर्व आठ आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्याच्या कलम 13, 17, 18, 38, 39 आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (बीएनएस) कलम 148 आणि 61 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सक्रिय दहशतवादी नेटवर्कची तयारी
अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये आपल्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्यासाठी जैश-ए-मोहम्मदचे एक सक्रिय नेटवर्क स्थापित करत होते. गुजरात एटीएसनुसार, सर्व आरोपींविरुद्ध यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आठ आरोपी गुजरात आणि मध्य प्रदेशातील विविध जिह्यांचे रहिवासी आहेत.
देशात दहशतवादी कारवाया करण्याची योजना
गुजरात एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, तीन आरोपी चिखली आणि सिद्धपूर येथील मदरशांशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. हे आरोपी दहशतवादी संघटनेसाठी एक सक्रिय दहशतवादी नेटवर्क तयार करत होते. या गटाचे गुजरात आणि देशाच्या इतर भागांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचे उद्दिष्ट असल्याचा संशय आहे.

Advertisement

संशयितांची कसून चौकशी सुरू
एटीएस अटक केलेल्या संशयितांची सतत चौकशी करत आहे. हे पथक त्यांच्या भरतीचे प्रयत्न, संपर्क, निधीचे स्रोत आणि दहशतवादी नेटवर्कशी संबंधित कट उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या कारवाईपूर्वी दिल्ली आणि नजिकच्या राज्यांमधूनही काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अन्य साथीदारांचा शोध घेऊन दहशतवादी कारवायांना आळा घालण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून सुरू आहे.

26 वर्षांपूर्वी जैश-ए-मोहम्मदची स्थापना
जैश-ए-मोहम्मद ही एक पाकिस्तानी दहशतवादी संघटना असून तिची स्थापना दहशतवादी मसूद अझरने 2000 साली केली होती. भारतासह अनेक देशांमध्ये दहशतवादी हल्ले केल्याचा आरोप या संघटनेवर आहे. जैशचे मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे आहे.

ही संघटना पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये प्रशिक्षण शिबिरे आणि दहशतवादी जाळे चालवते. तिचा नेता, दहशतवादी मसूद अझर याला 1994 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये अटक करण्यात आली होती. तथापि, डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या आयसी-814 विमानाचे अपहरण झाल्यानंतर ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात भारत सरकारने त्याची सुटका केली होती.

Advertisement
Tags :

.