‘मोफत बसपास’साठी मार्गसूची जारी
विद्यार्थ्यांना सेवा सिंधू पोर्टलवर अर्ज करावा लागणार : परराज्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुविधा
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
विद्यार्थिनींप्रमाणेच विद्यार्थ्यांनाही राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करण्यासाठी मोफत बसपास देण्यात येणार आहे. शुक्रवारी परिवहन खात्याने यासंबंधीची अधिकृत मार्गसूची जारी केली. त्यानुसार परराज्यातील शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणि राज्याच्या सीमेवर राहून कर्नाटकात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
मागील आठवड्यात डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लागलीच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास सुविधा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार परिवहन खात्याने विद्यार्थ्यांना मोफत बसपास वितरणासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गसूचीनुसार राज्यातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळ (केएसआरटीसी), कल्याण कर्नाटक परिवहन निगम (केकेआरटीसी) वायव्य कर्नाटक परिवहन निगम (एनडब्ल्यूकेआरटीसी) आणि बेंगळूर महानगर परिवहन मंडळ (बीएमटीसी) या चारही परिवहन संस्थेच्या बसेसमधून शाळा-महाविद्यालयांपर्यंत मोफत प्रवास करू शकतील.
परिवहन निगम विद्यार्थ्यांना मोफत बसपास वितरणासाठी सध्या असणाऱ्या नियमांचे पालन करतील. शैक्षणिक पात्रतेचे निकष, अंतराची मर्यादा आणि विद्यार्थी बसपासचा कालावधी यासारखे नियम लागू असतील. विद्यार्थी राज्य सरकारच्या सेवा सिंधू पोर्टलवर कोणत्याही ठिकाणाहून आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करू शकतात.
शुल्क भरून बसपास घेतलेल्यांना रक्कम परत मिळणार
सध्या राज्यातील चार परिवहन निगमकडून 19,792 विद्यार्थ्यांनी निर्धारित शुल्क भरून बसपास खरेदी केले आहेत. या विद्यार्थ्यांना पुढील 15 दिवसांत ही रक्कम परत केली जाईल. दरम्यान, मोफत प्रवासासाठी जुना बसपास वापरता येईल. सदर मोफत बसपास राज्यात राहणाऱ्या आणि शेजारील राज्यांतील शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शेजारील राज्यांमध्ये (राज्याच्या सीमेवर) राहणाऱ्या आणि कर्नाटकातील शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपलब्ध असेल.
मोफत बसपासची वैशिष्ट्यो
मोफत बसपास मिळविणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अपघात विमा देखील मिळेल. यासाठी सरकार दरमहा प्रतिविद्यार्थी 5 रुपये प्रीमियम भरेल. सरकार परिवहन निगमना प्रति बसपास 100 रुपये प्रक्रिया शुल्क देईल. अपघात नुकसान भरपाई निधी व प्रक्रियेसाठी सरकार चारही परिवहन निगमना 15 कोटी रु. देईल. सर्व विद्यार्थ्यांना मोफत बसपास वाटप करण्यासाठी वर्षाला 286.08 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकार ही रक्कम राज्यातील चारही परिवहन निगमना देईल.