हुमणी रोगाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सहसंचालक एच. डी. कोळेकर यांची माहिती : पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन
बेळगाव : हुमणी हा रोग ऊस पिकासाठी गंभीर व हानीकारक आहे. कारण यामुळे पीक पूर्णपणे वाळून जाते. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार लावणीच्या संकटासह आर्थिक परिणाम होतो. हुमणीपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी कृषी खात्याकडून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मार्च व एप्रिलमध्ये तज्ञांकडून क्षेत्र कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर कर्मचाऱ्यांकडून पिकांची पाहणी करून पिकांच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांना पुस्तिका देण्यात आल्या आहेत. हुमणी व कीड रोगाला डोण्णी, मूळ खाणारा व खतातील अळीही म्हणतात. यामुळे शेतकऱ्यांना पिकाचे संगोपन नियोजबद्धरित्या करता यावे, यासाठी कृषी विभाग तत्पर असून शेतकऱ्यांनी खात्याने घालून दिलेल्या मार्गदर्शक मूल्यांचे पालन करून पिकांचे संरक्षण करावे, असे आवाहन सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी केले.
तसेच या रोगाचा इतर पिकांनाही फटका बसू शकतो. भारतात असे 100 हून अधिक पिकांना धोका असणारे किडे असून कर्नाटकातही अनेक प्रजाती आढळून आल्या आहेत. हुमणी हा किडा वर्षातून एकदा जीवनचक्र पूर्ण करतो. वर्षातील पहिला पाऊस पडतो तेंव्हा व सिंचनाखालील भागात जानेवारी ते मेदरम्यान बाहेर पडतो. तसेच विजेचे दिवे व प्रकाश असलेल्या भागात हुमणीचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. कारण हुमणी प्रकाशाकडे आकर्षित होतो. हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उसाची पाने पिवळी पडतात. ठिकठिकाणी ऊस सुकलेले आढळून येतात. ऊस लागवडीच्या वेळी प्रति एकर 2 किलो मेटारायझियम पावडर शेणात मिसळून शेतात टाकावी. तर उभ्या पिकाला हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यास 10 मी. क्लोरफायरीफॉस 20 ईसी प्रति लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी.
नुकसान झालेल्या पिकाच्या पायथ्याशी प्रति हेक्टर 500 लिटर पाणी द्यावे. एप्रिल-मे महिन्यात कडुलिंबाच्या किंवा जाळीच्या झाडांच्या देठांचे तुकडे करून त्यांना पानांसह शेताच्या पायथ्याशी लावून पानांवर किटकनाशक औषधांची फवारणी करावी. असे केल्याने हुमणी अंडी घालण्यापूर्वीच नष्ट होतील. पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात जेव्हा हुमणी परिपक्व होते. म्हणजेच एप्रिल, मे, जून आणि जुलै महिन्यात शेतात गाळाचा थर तयार करण्यासाठी चांगले पाणी द्यावे. यामुळे पिकाचे नुकसान टाळता येऊ शकते. पूर्ण वाढ झालेल्या हुमणी नियंत्रित करण्यासाठी कोणतेही रसायन प्रभावी नाही. तसेच हुमणी ऊस, मिरची, भुईमूग, वांगी आदी पिकांनाही नुकसान पोहोचविते. याचे वेळेवर संगोपन झाल्यास नुकसान टाळता येते. यासाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाला भेट देऊन हुमणीबाबतच्या आवश्यक मार्गदर्शक उपाययोजनांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन कृषी खात्याकडून करण्यात आले आहे.