सराफ असोसिएशन शहापूरतर्फे मार्गदर्शन
जीएसटीबद्दल सविस्तर माहिती अन् शंकाचे निरसन करून घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
इंडियन बुलियन ज्वेलरी असोसिएशन (आयबीजेए) व दि सराफ असोसिएशन शहापूर तसेच वर्ल्ड गोल्ड कौन्सिल यांच्यावतीने मंडोळी रोडवरील ग्रीन ऑलिव्ह येथे परिषद घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रादेशिक उपाध्यक्ष विजयकुमार लष्करे, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप तिळवे, दक्षिण महाराष्ट्र उपाध्यक्ष विजयकुमार भोसले, सीए राजेंद्र जोशी उपस्थित होते.
प्रारंभी दिलीप तिळवे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष अभिनंदन लेंगडे, खजिनदार आनंद भोसले, संयुक्त सचिव मकरंद कारेकर, समिती सदस्य अभिजित हेरेकर, राजेंद्र शिरोडकर, संतोष कलघटगी यांच्या हस्ते अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विजय यांनी आयबीजेएचे नवीन उपक्रम, योजना, बुलियन रिफायनरी व चांदीच्या प्रदर्शनाबाबत माहिती दिली. जुन्या दागिन्यांचे जतन कसे करावे? याचीही त्यांनी माहिती दिली. विजयकुमार भोसले यांनी ग्राहकांशी संबंध, शिस्त, भांडवलांची काळजी कशी घ्यावी? याबद्दल मार्गदर्शन केले.
राजेंद्र जोशी यांनी जीएसटीबद्दल सविस्तर माहिती दिली व उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. दिलीप तिळवे यांनी आयबीजेएमध्ये सहभागी होऊन नियमित बैठकांना उपस्थित राहून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन अॅड. तेजस्विनी तमूचे यांनी केले. याप्रसंगी सौंदत्ती, बैलहोंगल, कित्तूर, रायबाग, गोकाक, घटप्रभा, हुक्केरी, निपाणी येथील ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते.